घरची कसलीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना शेतकर्यांचा मुलगा कोथळी गावच्या सरपंचपदापासून ते राज्याच्या विविध खात्याचे मंत्रीपदापर्यंतची एकनाथराव खडसे यांचा प्रवास सर्वांना अचंबित करणारा आहे. 1990 मध्ये पहिल्यांदा मुक्ताईनगर मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेल्यानंतर आपल्या अभ्यासू वृत्तीने विधानसभेत आपली छाप पाडली. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची त्यांच्या शैलीने महाराष्ट्राचेही त्यांनी लक्ष वेधून घेतले. त्यानंतर 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाथाभाऊ पुन्हा मुक्ताईनगर मतदार संघातून निवडून गेले आणि भाजप- सेना युतीच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री, शिक्षणमंत्री आणि पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. अर्थखात्याचा कसलाही अनुभव नसताना अभ्यासूवृत्तीमुळे अर्थखात्याचा कारभार लिलया हाताळला शिक्षणमंत्री म्हणूनही त्याची कारकिर्द लक्षात राहणारी ठरली. त्यानंतर त्यांचेकडे पाटबंधारे खाते सोपविण्यात आले आणि तापी खोरे विकास महामंडळाची स्थापनाही त्यांचीच देण आहे. त्या कालावधीत तापीवर शेळगाव बॅरेज, अमळनेर येथील पाडळसरे प्रकल्प, धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बॅरेज, प्रकाशा बॅरेज आणि सिंचन प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यानंतर मात्र गेल्या 20 वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले गेले. गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर असूनसुद्धा त्याला गती मिळाली नाही ही खंत एकनाथराव खडसे यांना मात्र बोचते आहे. महाराष्ट्रात 2014 साली भाजप- सेनेचे सरकार निर्माण झाले तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असलेल्या या नेत्याकडे महसूल, कृषीसह आठ खात्याचे मंत्रीपदाची धुरा सक्षमपणे सांभाळणारे एकनाथराव खडसे यांना पुणे येथील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणावरुन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांचेवर दाऊद या कुख्यात गुंडाशी संबंध असल्याच्या आरोपासून अनेक आरोप करण्यात आले. परंतु या सर्व आरोपातून त्यांना क्लीन चीट मिळाली. तथापि राजकीय स्पर्धेतून त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. त्यामुळे ते फार व्यथित झाले. जनसंघापासून ते भाजपपर्यंत पक्षाशी एकनिष्ट असताना आणि जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात पक्ष वाढविण्यासाठी एकनाथराव खडसेंनी जिवाचे रान केले. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे रोवली त्यामुळे गेल्या 40 वर्षांची राजकीय कीर्द एका निर्णयाने कलंकित करण्याचा प्रयत्न झाल्याने ते व्यथित आहेत.
आज एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त चार मंत्र्यांच्या उपस्थितीत कोथळी येथे आज रविवारी नागरी सत्कार होत आहे. भाजप कोअर कमेटीचे सदस्य असलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे मंत्री सत्काराला उपस्थित राहणार आहेत. एकनाथराव खडसे यांच्या नागरी सत्कार समारंभात हे मंत्री काय बोलतात त्यावर बरेच अवलंबून राहणार आहे. मुख्यमंत्र्यांचे खास मर्जितील असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेही या नागरी सत्काराला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. जळगाव जिल्हा भाजपतील गटबाजीमुळे नाथाभाऊ आणि गिरीश महाजन यांचे विळ्याभोपळ्याचे नाते निर्माण झाले आहे. त्यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत. मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली अशी व्यथा एकनाथराव खडसे यांनी केली तेव्हा त्यांना पंतप्रधान व्हावे, असे वाटेल परंतु पक्षाने केले तरच ते शक्य आहे. अशी उपरोधीक टीका गिरीश महाजन यांनी केली आणि या दोन नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद आहेत. हे या वक्तव्यावरुन दिसून येते. त्याचबरोबर नाथाभाऊंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महसूलमंत्री पदाची जबाबदारी चंद्रकांत पाटलांकडे सोपविण्यात आली तेव्हा मी रामभक्त भरत असून मी त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याचे कामकाज करत आहे. नाथाभाऊ जेव्हा पुन्हा परततील तेव्हा त्या पादुका त्यांचेकडे परत करणार आहे. अशा प्रकारचे व्यक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केले होते. परंतु दोन वर्षे झाली. नाथाभाऊंवरील सर्व आरोपांना क्लीन चिट मिळाली त्यानंतर एकनाथराव खडसे यांची घरवापसी केव्हा होईल असे पत्रकारांनी विचारले असता समयसे पहिले भाग्यसे जादा कभी नही मिलता असे चंद्रकांत पाटलांनी उपरोधिक व्यक्तव्य केल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.
राजकीय सत्ता स्पर्धेत जळगाव जिल्ह्याला या गोष्टी नवीन नाही. याआधी माजी शिक्षणमंत्री आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनाही असाच अनुभव आला. मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असलेले बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचेवर काँग्रेस पक्ष नेतृत्वाची खप्पा मर्जी असल्याने त्याची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. त्यांचे जागी माजी केंद्रिय मंत्री शंकरराव चव्हाण यांना पक्षाने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. परंतु या शर्यतीत असलेले बाळासाहेब चौधरी यांचेबाबतीत शंकरराव चव्हाणांनी मात्र सुडाची वागणूक दिली. सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची उचलबांगडी करुन त्यांना केंद्रात मंत्री केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांचे नाव विलासरावांनीच सुचविले. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर अशोक चव्हाणांनी विलासराव देशमुखांविरोधात भूमिका घेवून त्यांच्या ध्येय धोरणाला हरताळ फासला. हे सर्व काही काँग्रेस नेत्यांच्या प्रवृत्तीतून झाले. तथापि भाजप हा साधनसुचिता मानणारा पक्ष आहे. त्यामुळे भाजपचे नेतृत्वाकडून नाथाभाऊंची घर वापसी व्हावी, ही अपेक्षा! तसे झाले तर नाथाभाऊंना वाढदिवसाची भेट मिळेल आणि त्याचा खान्देशवासियांना आनंद होईल.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.