जळगाव : संपूर्ण देश 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या सप्तसूत्रीबी सुत्रीचे नागरिकांनी पालन करावे असे अवाहन भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. जनतेने सरकारला सहकार्य करावे. बरेच जण कामे नसताना देखील सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. त्यामुळे प्रशासनाला ताण सहन करावा लागतो. पंतप्रधानांनी दिलेल्या सप्तसूत्रीचे तंतोतंत पालन केल्यास कोरोना विषाणूला नक्कीच हरवता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“आतापर्यंतचा अनुभव पाहता जनतेने सहकार्य करण्याची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी कामे नसतानाही लोक बाहेर पडतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडतो, अशा स्वरुपामध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या सप्तसूत्री लॉकडाऊन सूचनेचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, त्यामुळे कोरोना पळवण्यासाठी आपल्याला यश येईल. नागरिकांनी सहकार्य करावे”, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी, “करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेले नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.