जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मिशन मोडवर काम करावे – आ.मंगेश चव्हाण

0

चाळीसगाव तालुका समन्वय समितीची पहिल्या दिवसाची बैठक संपन्न,

विविध विभागांचा घेण्यात आला आढावा

चाळीसगाव : भौगोलिक दृष्टीने जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा असलेल्या चाळीसगाव तालुक्यात विकासकामे  मोठ्या प्रमाणात सुरु असून अनेक प्रलंबित प्रश्न  मार्गी लावणे गरजेचे आहे,  तरूण अधिकाऱ्यांची उमेद व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा याचा समन्वय साधत चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मिशन मोडवर काम करावे, यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य एक लोकप्रतिनिधी म्हणून मी करणार असून मुंबई येथे पूर्णवेळ समन्वय कक्ष स्थापन करण्यात येईल तसेच चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कामात कुठल्या प्रकारचे आडकाठी न आणता त्यांना अधिक प्रोत्साहन कसे देता येईल यासाठी प्रयत्न राहील मात्र सोबतच जनतेला विनाकारण वेठीस धरणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्या ते चाळीसगाव तालुका समन्वय समितीच्या बैठकीत बोलत होते यावेळी चाळीसगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री सातारकर, तहसीलदार श्री अमोल मोरे यांच्यासह नायब तहसीलदार विशाल सोनवणे सचिन निकुंभ, नानासाहेब आगळे, गिरणा पाटबंधारे अभियंता हेमंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नवनाथ सोनवणे, वरखेडे – लोंढे बरेज चे अभियंता सचिन सोनवणे, तालुका कृषी अधिकारी साठे साहेब, वीज वितरण चे कार्यकारी अभियंता शेंडगे साहेब, आगार व्यवस्थापक संदीप निकम व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

चाळीसगाव तालुक्यातील विविध विभागांचा कामाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसीय आढावा बैठकांचे आयोजन तहसिल कार्यालयात दिनांक १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे त्यात आज दिनांक 16 रोजी कृषी विभाग, विद्युत वितरण कंपनी, बस आगार, सार्वजनिक बांधकाम विभाग, वरखेडे लोंढे  बॅरेज, गिरणा पाटबंधारे उपविभाग, आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय, महिला व बालविकास विभाग आदी विभागांचा आढावा घेण्यात आला

पीक विम्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पाठपुरावा करा

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी पिकाच्या उत्पादनाला  संरक्षण मिळावे यासाठी विमा रक्कम भरत असतो मात्र विमा कंपन्यांच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षाने कुठल्याही प्रकारचा विम्याचा लाभ त्यांना मिळत नाही यावर्षी अवकाळी पावसाने शेतकरी खचला आहे, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शासकीय मदती बरोबरच हक्काचा पिक विम्याची मदत मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने समन्वयाची भूमिका घ्यावी व विमा कंपनीकडे शेतकऱ्यांना समाधानकारक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करावा गरज पडल्यास यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी मी सदैव तयार राहील तसेच कै गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आता शेतकरी कुटुंबातील इतर सदस्यांसाठी सुद्धा मागू झाल्याने त्याची व्याप्ती वाढली आहे याबाबत जनजागृती करून अपघात दुर्दैवी मृत्यू होणारे शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दोन लाख रुपये मदत मिळवून देण्यासाठी  प्रयत्न करावे यासाठी अपघाताची माहिती असणाऱ्या पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योजना राबवावी. अश्या सुचना तालुका कृषी अधिकारी साठे यांना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्या तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी, योजना, उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी मिळवून देण्यासाठी कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले

शासनाचे धोरण शेतकऱ्यांचे मरण ठरू नये

एकीकडे शेतकरी जगला पाहिजे म्हणून सर्व जण बोलतात मात्र त्याच शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळावे यासाठी नवीन विज कनेक्शन देणे शासनाने बंद केले आहे तसेच अतिशय फायदेशीर अशा मुख्यमंत्री सौर पंप योजनेतुन नवीन वीज कनेक्शन सुद्धा बंद केल्याने आज शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे, केवळ पॉलिसी मॅटर नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक होत असेल, जर शासनाचे धोरण शेतकऱ्यांचे मरण ठरत असेल तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे नवीन विज कनेक्शन मिळावे यासाठी वीज वितरण कंपनीने सामंजस्याची भूमिका दाखवत बळीराजाला आधार द्यावा अशा सूचना कार्यकारी अभियंता श्री शेंडगे यांना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्या तसेच शहरातील IPDS योजनेअंतर्गत सुरू असलेले जुने पोल बदलणे नवीन तारा टाकने आदी कामे अतिशय संथ गतीने सुरू असून कामाबद्दल देखील अनेक तक्रारी आहेत. याबाबत आमदारांनी नाराजी व्यक्त केली तसेच चाळीसगाव शहरातील अंडरग्राउंड केबल साठी चा ५५ कोटींचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा अशा सूचनाही आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्या.

स्वच्छ व सुंदर बसस्थानक ही चाळीसगाव शहराची ओळख व्हावी, अतिक्रमण काढण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करा

बस स्थानक हा शहराचा व तालुक्याचा महत्वाचा केंद्रबिंदू असतो मात्र अस्वच्छतेमुळे तसेच अतिक्रमणामुळे बस स्थानकाला बकाल स्वरूप प्राप्त होते. चाळीसगाव बसस्थानक स्वच्छतेत हलगर्जीपणा करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करून स्वच्छतेसाठी नवीन मशीन सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्यात येईल तसेच मोडकळीस आलेल्या बसेस बाद करून नवीन 50 बसेस मागवण्याचा प्रस्ताव तयार करावा सोबतच मी माझ्या माध्यमातून बस स्थानक सुशोभीकरण व रंगरंगोटी, ऐतिहासिक धार्मिक छायाचित्रे लावून लावून देणार आहे, दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर डीपीडिसी फंडातून उपलब्ध करून दिली जाईल.

बस स्थानक नजीक असलेले अतिक्रमण व अवैद्य व्यवसाय बंद करण्यासाठी नगरपालिका व पोलिस प्रशासनाला पत्रव्यवहार करावा तसेच नाईट ड्युटी साठी जाणारे ड्रायव्हर कंडक्टर यांना जागा नसल्याने बस मधेच रात्र काढावी लागते अशी अडचण आगार व्यवस्थापक संदिप निकम यांनी मांडली असता कर्मचाऱ्यांच्या निवाऱ्यासाठी संबंधित गावांच्या सरपंचांशी बोलून सुरक्षित अशी जागा त्यांना उपलब्ध करून देण्यात मी स्वतः वैयक्तिक पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले.

वरखेडे प्रकल्पबाधित तामसवाडी गावाच्या 100% पुनर्वसनासाठी पाठपुरावा करा

केंद्राच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेतून निधी प्राप्त झालेल्या वरखेडे लोंढे प्रकल्पाचे काम मार्च दोन हजार वीस मध्ये पूर्ण होणार असून या धरणाच्या बुडीत क्षेत्रात तामसवाडी गाव येथे तेथील ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्‍न अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा असून त्यांचे 100% टक्के पुनर्वसन व्हावे याबाबत जलसंपदा नियामक मंडळाच्या बैठकीत मुद्दा मांडण्यात येईल सोबतच गावातील घरांचे मूल्यांकन कृषी विभागाकडून तात्काळ करावे तसेच भूसंपादन बाबत भुमिअभिलेख कार्यालयाने तात्काळ आपली कार्यवाही पूर्ण करावी अशा महत्त्वाच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी वरखेडे लोंढे बॅरेजचे अभियंता सचिन पाटील यांना दिल्या मन्याड धरणाची उंची वाढवण्यासाठी नवीन प्रकल्प अहवाल तयार करून जास्तीत-जास्त सिंचन क्षमता वाढविण्याचा, मन्याड व गिरणा पादचाऱ्यांच्या दुरुस्ती सिमेंटीकरण साठी पाठपुरावा करून अधिकचे एक आवर्तन शेतकऱ्यांना मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच नवीन पाणीवापर संस्था तयार करण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी गिरणा पाटबंधारे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील यांना दिल्या.

आरोग्य विभागाचा आढावा देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर देवराम लांडे उपस्थित होते यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी केवळ शासकीय रुग्णालय आहे म्हणून लोकांची नकारात्मक मानसिकता बदलण्याची गरज आहे.

यासाठी आपणही तेवढेच जबाबदार असून तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्र उपकेंद्र यांची पाहणी करणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले तसेच तालुक्यात गटनिहाय आरोग्य शिबुरांचे नियोजन करावे. जागेअभावी प्रलंबित असलेल्या हिंगोणे व डोणदिगर येथील उपकेंद्रांची जागेची अडचण सोडविण्यात येईल तसेच ज्या आरोग्य केंद्रांना संरक्षक भिंत नाही ती बांधण्यासाठी देखील कशा पद्धतीने मदत करता येईल या बाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्या शहरातील ग्रामीण रुग्णालयात नवीन एक्सरे मशीन उपलब्ध करून देऊन अधिकाधिक रुग्णांना लाभ देण्यासाठी नगरपालिका सोबत संयुक्त बैठक लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या,

महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प 1 व प्रकल्प 2 च्या पर्यवेक्षिका यांनी अंगणवाडी केंद्रांना विज कनेक्शन, पाणी आदी मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात तसेच अंगणवाडी सेविकांना चाळीसगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी मीटिंग साठी जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली यावर या दोन्ही बाबींसाठी स्वतः वैयक्तिक लक्ष घळण प्रयत्न करणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.