आ. शिरीष चौधरी निवडणूक लढणार नाहीत ; ना. गिरीश महाजन
जळगाव, –
खासदार ए.टी.पाटलांनी जिल्ह्यात खूप कामे केली आहेत. त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. त्यांनी माझ्यावर आरोप केले होते. जनता त्यांना निवडून देणार असेल तर त्यांनी निवडणूक लढवावी असे खुले आव्हान जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी दिले. मंगळवारी जळगाव कार्यालयात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी गिरी महाजन यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.
अनामत जप्त होण्यापासून रोखावी
धुळे मनपामध्ये गोटेंनी यांना आम्ही अनामत रक्कम जप्त होण्यापासून रोखावी आणि शून्य फोडून दाखवावा असे आव्हान दिले होते. परंतु तिथे त्यांची एक जागा आल्याने आम्ही तोंडावर पडलो. जळगाव मनपात देखील काँग्रेस-राष्ट्रवादीला भोपळा फोडता आला नाही, असा टोमणा ना.महाजन यांनी मारला. तसेच अनामत जप्त होण्यापासून रोखण्याचे आव्हान जळगाव मतदार संघात देखील राहणार आहे.
शिवसेनेसोबत चर्चा करणार
राज्यात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा वाद प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. राज्यात शिवसेनेचे 23 तर भाजपाचे 25 उमेदवार आहेत. स्थानिक पातळीवर शिवसेनेला सामावून घेण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. राज्यात काही ठिकाणी भाजपा तर काही ठिकाणी शिवसेना स्पष्ट बहुमतात आहे. मनपा आणि जि.प.मध्ये आम्हालासोबत घ्या अशी त्यांची मागणी आहे परंतु जिथे स्पष्ट बहुमत आहे तिथे ते शक्य नाही. परंतु तरीही त्याबाबत चर्चा करू असे ना.महाजन यांनी सांगितले.
माणिकराव गावितांचा मुलगा भरत गावित हे भाजपात प्रवेश करणार असल्याबाबत गिरीश महाजनांना विचारणा केली असता ते दोन दिवसात समजेल असे ते म्हणाले.
आमदार शिरीष चौधरी माघार घेणार
अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी हे जळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. परंतु शिरीष चौधरींशी माझं बोलणे झाले असून ते माघार घेणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी दिली. राजकीय डाव टाकण्यात गुरू मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी चौधरींशी चर्चा करीत त्यांना माघार घेण्यास राजी केले आहे. दरम्यान, आमदार शिरीष चौधरी यांनी अमळनेर विधानसभा मतदार संघातून भाजपाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचा बोलीवर ही माघार मान्य केली असल्याची चर्चा आहे.