जंगली पुदीन्याच्या चाऱ्यापासुन गुरांचे संरक्षण करा – डॉ. अशोक महाजन

0

पाचोरा – अतिवृष्टीमुळे मका, ज्वारी सारख्या पिकांचा चारा खराब झाला असुन बांधांवर बुरशीजन्य गवत व खराब चाऱ्यामुळे गुरांना चाऱ्याची कमतरता भासत आहे. शेतामध्ये कापसाचे पिक काढल्यानंतर बी. टी. बियाण्यासोबत जंगली पुदीना (अॅरजिटम) ही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. ही वनस्पती गुरांच्या पोटात गेल्यास जनावरांना विषबाधा होऊन गुरे दगवु लागले आहे. गेल्या महिन्यात जामनेर तालुक्यातील लोंढ्री तांडा येथे ३० तर पाचोरा तालुक्यातील नाईकनगर येथे जंगली पुदीन्यासारखी पांढरी फुले असलेली वनस्पती खाल्ल्याने सात गुरे दगावली होती. याबाबतचा औंध (पुणे) येथील प्रयोग शाळेचा अहवाल ही पाॅझिटीव्ह आलेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांना अॅरजिटम नावाच्या वनस्पतीचा चारा खाण्यापासुन दुर ठेवावे. असे आवाहन तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक महाजन यांनी डांभुर्णी ता. पाचोरा येथे वंधत्व निवारण व पशु आरोग्य तपासणी आयोजित शिबिरात केले.

शिबिराचे उद्घाटन सरपंच कैलास परदेशी यांच्या हस्ते गौपुजनाने करण्यात आले. यावेळी उपसरपंच शांतीलाल परदेशी, भरत परदेशी, भगतसिंग परदेशी, पदमसिंग परदेशी, गोकुळ परदेशी, चतरसिंग परदेशी, रामलाल गांगे, प्रकाश तांबे, संजय परदेशी सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शिबिरात डॉ. अशोक महाजन, डॉ. रविंद्र टेंम्पे, डॉ. गौतम वानखेडे, डॉ. मडावी, चिंधु परदेशी, दिपक साळवे, प्रविण महाले यांनी सुमारे ३०० गुरांची तपासणी करून उपचार केले. शिबिरा दरम्यान डॉ. अशोक महाजन यांनी गुरांना विषबाधा झाल्यास चुन्याची निवळी करुन पाजावी. बुरशीजन्य चारा खाऊ घातल्यास मुत्रमार्गात मुतखड्यासारखे आजार होवुन जनावरे दगावण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी वेळीच दक्षता घेऊन विषबाधा झाल्याची लक्षणे आढळुन आल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणुन उपचार करावा असे आवाहन ही यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.