उद्या नगरमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई
वृत्त संस्था –
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपमधून बडतर्फ केलेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला 15 दिवसांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करा, या मागणीसाठी उद्या नगरमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती.
छिंदम याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून सध्या तो जामीनावर बाहेर आहे. नगरमध्ये उद्या सकाळी 11 वाजता शिवप्रेमींच्या वतीने छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करा, या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू होणार असून तो माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोडमार्गे चौपाटी कारंजा येथे येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर छिंदमला 15 दिवसांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.