नवी दिल्ली : भाजपा नेते जयभगवान गोयल यांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. त्यांनी ”आज के शिवाजी नरेंद्र मोदी” नावाने पुस्तक प्रकाशित केले होते. त्यांच्या या पुस्तकावरून देशभरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. हे प्रकरण शांत होते ना होते तोपर्यंत याच्याशीच निगडीत एक प्रकरण पुन्हा समोर आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करुन मिटलेला वाद पुन्हा उकरुन काढला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर ट्विटच्या माध्यमातून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी छत्रपती मोदी जिंदाबाद! अला उल्लेख केला आहे. त्यांच्या या ट्विटमुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला असून त्यांना केवळ 8 जागेवर समाधान मानावे लागले आहे. गेल्या दीड वर्षांत देशातील विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या निवडणुका, त्यानंतर लोकसभा निवडणूक आणि गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या विधानभा निवडणुका यांचे निकाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्याची क्षमता कुणामध्ये नाही हे स्पष्ट होते. देशाच्या जनतेचे मोदींना आणि मोदींनी जनतेला आपलंस केले आहे. छत्रपती मोदी जिंदाबाद! अशा आशयाचे ट्विट उमा भारती यांनी केले आहे.
यापूर्वी भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले मोदींशीच काय छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणे खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत भाजपला सुनावले होते. अखेर भाजपने पुस्तक मागे घेतल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर हा वाद मिटला होता. उमा भारती यांच्या ट्विटने या वादाला पुन्हा तोंड फुटण्याचे शक्यता आहे.