जळगाव जिल्ह्यातील सरकारी नोकराची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.सोसायटी. जिल्ह्यातील सर्वांत मोठी पतपेढी. 100 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या सोसायटीचे जिल्ह्यात सुमारे 36 हजार पेक्षा जास्त सदस्य आहेत. या सोसायटीचे सहकारी बँकेत रुपांतर होणे, सहज शक्य असतांना रिझर्व बँकेच्या नियमांचे पालन करणे अवघड असल्याने पतपेढीचेच अस्तित्व ग.स.ने स्विकारले. सध्या ग.स.सुध्दा आर्थिक चौकशीच्या फेर्यात सापडली आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे या सोसायटीची चौकशी करण्यात आदेश दिले आहे. सोसायटीत 50 लाख रूपयांच्या ठेवी संदर्भात केलेल्या तक्रारीवरून ग.स.ची चौकशी होतोय. लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे चौकशी करण्याचे आदेश ग.स.ला प्राप्त झाले असतांना तो आदेश दडपण्यात आला. परंतु कोंबडा झाकल्याने तो हरविला नाही म्हणून सुर्य उगवायचा थांबत नाही. तो उगवतोचं अखेर चौकशी आदेशाचा भंडाफोड झाला आणि ग.स.मध्ये ठेवीच्या रुपाने झालेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरु झाली. य चौकशीतून आणखी काही घोटाळा बाहेर निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग.स.सोसायटीची सभासद संख्या मोठी असल्याने दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तोंडावर सोसायटीच्या कारभाराविषयी उलटसुलट आरोपाच्या फैरी झडतात. उलटसुलट चर्चेला उत येते. सोसायटीत गटबाजी असल्याने एक गट दुसर्या गटावर ; दुसरा गट सत्ताधारी गटावर आरोप प्रत्यारोप करतात. जळगावात ज्यादिवशी ग.स.ची वार्षिक सर्वसाधारण सभा असते. त्यादिवशी शहराला यात्रेचे स्वरूप पहायला मिळते. जिल्हा भरातील सदस्य आणि विशेषतः त्यात शिक्षकांची संख्या मोठी असते. जळगावात एकच गर्दी होते. ही सर्व गर्दी पाहून ग.स.ची वार्षिक सभा गाजणार असे चित्र पहायला मिळेल असे सर्वांना वाटते. परंतु सर्वसाधारण सभा मात्र अवघ्या पाच मिनिटांच्या आत आटोपलेली असते. विषय पत्रिकेवरील सर्व विषय आवाजी घोषणांनी मंजूर केले जातात. विरोधी गटाचे सदस्य ओरडत राहतात. बहुमतापुढे त्यांचे काहीच चालत नाही. सभा संपली रे संपली कि सर्व सदस्य सभेचा भत्ता घेण्यासाठी एकच गर्दी करतात. विशेष म्हणजे सभेचा भत्ता घेणार्या सदस्यांची पाकिटे आधीच तयार ठेवली जातात. रांगेत येवून सही करा आणि भत्त्याचे पाकिट घेवून निघून जा. याप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेचे ठिकाण अवघ्या अर्ध्यातासाच्या आत रिकामे होते. ग.स.चे सर्व सभासद हे सुशिक्षीत असतांना सुध्दा वार्षिक सभेत नियमाला सत्ताधार्यांनी वाटाण्याच्या अक्षदा लावले जातात. त्याला सभासदांकडून कसलाही विरोध होत नाही हे येथे खेदाने नमूद करावेसे वाटते.
ग.स.तील सहकार गटाचे नेते बी.बी.पाटील यांचा मुलगा किरण पाटील हा नोकरीला असतांना ग.स.मध्ये 50 लाख रूपयांची ठेव ठेवण्या इतपत त्याच्याकडे रक्कम आली कोठून? अशी तक्रार ग.सचे माजी चेअरमन मगन पाटील यांनी केली आहे. या तक्रारीवरून मुख्यमंत्र्यांनी हे चौकशीचे आदेश दिले आहेत. तथापि, किरण पाटील यांनी 50 लाखांची ठेव ठेवलीच नाही. ती ठेव माजी चेअरमन सुनिल सुर्यवंशी यांची असून किरण पाटील यांची खोटी सही करून ठेव ठेवल्याचा आरोप स्वतः बी.बी.पाटील यांनी केला आहे. याठेवीचे गौडबंगाल जे काही आहे ते आता चौकशीतून बाहेर येणार आहे. 50 लाख रूपये 7 महिन्यासाठी सोसायटीत ठेव ठेवले आणि 7 महिन्यानंतर त्याचे व्याजासह 51 लाख 78 हजार 887 रूपये व्याजासह काढून घेण्यात आले. हे मात्र कागदोपत्री सत्य आहे. सध्या बँकाचे घोटाळे उघड होत असतांना ग.स.सारख्या मोठ्या पतपेढीतही होणारा घोटाळा उघडकीस आल्याने ग.स.सोसायटी चौकशीच्या फेर्यात सापडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्यावतीने चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डिवायएसपी गोपाळ ठाकूर यांनी म्हटले आहे. या चौकशीतून अनेक बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे. ग.स.मध्ये असलेल्या सत्ताधारी गटांवर सातत्याने विरोधी गटाकडून आरोप होत असतात. त्यात फर्निचर खरेदीमध्ये लाखो रूपयांचा घोटाळा ; नोकर भरती मोठा आर्थिक घोटाळा वगैरे वगैरे या होणार्या आरोप प्रत्यारोपाची सुध्दा एकदा चौकशी झाली पाहिजे. ती चौकशी होवून एकदाचे दुध का दुध पाणी का पाणी झाले पाहिजे. तरच या पुढे होणारे आरोप प्रत्यारोप थांबतील आणि या आरोप प्रत्यारोपामुळे मलिन होणारी ग.स.ची प्रतिमा आपोआप थांबेल.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post