चोरीच्या आरोपांवरून स्वयंपाक्याला बांधून बेदम मारहाण

बोदवड येथील प्रकाराने खळबळ ; दोन जणांना अटक

0

चोरीच्या आरोपांवरून स्वयंपाक्याला बांधून बेदम मारहाण
बोदवड येथील प्रकाराने खळबळ ; दोन जणांना अटक

बोदवड (प्रतिनिधी) – बोदवड येथे एका ४३ वर्षीय स्वयंपाक्यावर चोरीच्या आरोपावरून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

पीडित भागवत ओंकार शिंदे हे जामठी (ता. बोदवड) येथील रहिवासी असून, सध्या मलकापूर रोडवरील राजवीर हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतात. १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता ते हॉटेलमध्ये काम करत असताना संदेश बुंदेले (वय २४) हा तेथे आला. शिंदे हे पूर्वी बुंदेलेच्या जामनेर रोडवरील साकी हॉटेलमध्ये काम करत होते. ओळखीचा फायदा घेत संदेशने त्यांना दुचाकीवर बसवून आपल्या हॉटेलमध्ये नेले, जिथे त्याचा चुलतभाऊ मनीष वंजारी (वय २७) उपस्थित होता.

त्यानंतर संदेश आणि मनीष यांनी शिंदे यांच्यावर हॉटेलमधील चोरीचा आरोप करत त्यांना हात बांधून मारहाण केली. मनीषने खाट विणण्याच्या दोरीने त्यांना मारले. तसेच, वैभव आणि कल्पेश (पूर्ण नावे अज्ञात) यांनीही त्यांना मारहाण केली.

दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिंदे यांना अडवून ठेवण्यात आले. नंतर कसाबसा सुटून ते थेट बोदवड पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संदेश बुंदेले आणि मनीष वंजारी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी राजकुमार शिंदे करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.