चोपडा बसस्थानक परिसरात चोरीसाठी आलेल्या टोळीचा पर्दाफाश
जालना येथील पोलीस उपनिरीक्षकासह चौघांना अटक
चोपडा ;- चोपडा शहरातील बसस्थानक परिसरात चोरीसाठी आलेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि चोपडा पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीसोबत चक्क जालना पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
बुधवारी (१६ एप्रिल) चोपडा शहरातील बसस्थानक परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून प्रल्हाद पिराजी मालटे (वय ५८, रा. सदर बाजार, जालना) या पोलीस उपनिरीक्षकासह तिघा चोरट्यांना अटक केली. हे चौघे एमएच ४३ २९२८ क्रमांकाच्या वाहनातून पळून जात असताना धरणगाव नाक्यावर त्यांना अडवण्यात आले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रल्हाद पिराजी मालटे – पोलीस उपनिरीक्षक, जालना , श्रीकांत भिमराव बघे (वय २७, रा. गोपालनगर, खामगाव) , अंबादास सुखदेव साळगावकर (वय ४३, रा. माना, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) , रउफ अहमद शेख (वय ४८, रा. महाळस, जि. बीड) यांचा समावेश आहे.
यातील अंबादास साळगावकरवर याआधी तब्बल २७ चोरीचे गुन्हे दाखल असून, या टोळीच्या माध्यमातून आणखी अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सेवानिवृत्तीपूर्वीच पोलिसाच्या कृत्याचा भांडाफोड
प्रल्हाद मालटे हे तीन महिन्यांत सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्याआधीच त्यांचा चोरट्यांशी असलेला संबंध उघडकीस आला. ते जालना बसस्थानक परिसरात ड्युटीवर असताना संशयित आरोपींच्या संपर्कात आले आणि त्यांच्या टोळीसोबत सहभागी झाले. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
ही कारवाई चोपडा पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, एलसीबीचे पोउनि गणेश वाघमारे, पोउनि जितेंद्र वल्टे, पोहेकॉ. विलेश सोनवणे, दिपक माळी, रवींद्र पाटील आणि पोना हेमंत पाटील यांच्या पथकाने केली.
या टोळीने बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे दागिने आणि रोकड चोरी करण्याचा डाव आखला होता. यासंदर्भात मागील काही घटनांची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून टोळीवर लक्ष ठेवले जात होते.