खा.रक्षा खडसे यांचे तालुक्यात मताधिक्य घटणार
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्ष हवेत असून काँग्रेस उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचे प्रचार कार्य जोरात आहे. चोपडा तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप भैय्या पाटील, राजाराम पाटील आणि रा. काँ. पक्षाचे माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी व सहकार्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
रावेर लोकसभा मतदार संघात भाजपचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे अद्यापपर्यंत कुठेच प्रचार कार्यात दिसले नाहीत त्यांच्या स्नुषा विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी पाहिजेत ते भाजप केडरचे नेते व्यासपीठावर दिसत नसल्याने भाजप हवेत आहे. या उलट उन्हा तान्हात काँग्रेसचे कार्यकर्ते डॉ. ुल्हासदादांचा प्रचार करतांना दिसत आहेत. मागील खेपेस जे मताधिक्य चोपडा तालुक्याने श्रीमती खडसे यांना दिले होते ते यंदा मिळणार नाही असे चित्र दिसते.
रावेर लोकसभा मतदार संघात चोपडा तालुका हिंदुत्ववादी तालुका आहे. येथील भाजप उपर वाजपेयी निचे भाई अशीच आजवर राहिली आहे. विद्यमान निवडणुक सोबत नसल्याने उपर मोदी ही पंतप्रधानांची व्यक्तीश: करामत भाजपला कामी येईल नाहीतरी खडसे घराण्याने निष्ठावंत भाजपेयींना कधीच भाव दिला नाही. चोपडा तालुक्यात खडसेंचे कट्टर समर्थक म्हणून घन:शामभाई अग्रवाल यांनी आजवर काम केले आहे. परंतु भाजपची दुसरी एक फळी पाहिजे त्या प्रमाणात अजूनही सक्रिय झालेली दिसत नाही.
अजंतीसिम ते दहिगाव यावल तालुका असा चोपडा विधानसभा मतदार संघ असून यात मराठा, गुर्जर, मुसलमान, तडवी माळी व कोळी असे प्रमुख जाती धर्माचे लोक येथे राहतात शरदराव पवारांच्या रा.काँ. पक्षाने काँग्रेसला साथ दिली तर डॉ. उल्हासराव पाटील हे मताधिक्य घेऊ शकतात खासदार म्हणून श्रीमती रक्षाताई खडसे यांचा संपर्क तसा चांगला होता परंतु विकासाचे व्हिजन मात्र वापरण्यात त्या कमी पडलेल्या दिसतात. खडसे यांची मंत्रीपदावरून गच्छंती झाल्यानंतर मधल्या काळात रक्षाबाईंनींही मग फारसे लक्ष घातले नाही हातेड बु. हे गाव दत्तक घेतले परंतु या गावाचा पाहिजे त्या प्रमाणात कायापालट त्या करू शकलेल्या नाहीत या उलट मिळालेला निधी खर्च झाला नाही तरी कोठे ? असा सवाल तेथील ग्रामस्तांनी उपस्थित केला आहे.
चोपड्यात परंपरागत भाजपची मते आहेत या मतांना गुजराथींचे कोंदण लाभत गेले म्हणून भाजपचं चांगभलं झालं ग्रामीण भागात भाजप तसा फारसा कोठे दिसत नाही तालुका तसा रा. काँ. चा आहे पण गुजराथींचा करिष्मा संपला त्या दिवसापासून इथल्या रा. काँ. पक्षानेही बहिरेपणाचे सोंग घेतले आहे. परिणामी पक्ष दिशाहीन आणि कार्यकर्ते माजी आमदार कैलास पाटलांच्या नेतृत्वाखाली सैरभैर झाले आहेत. शिवसेनेत दोन गट, भाजपत दोन गट – तट काँग्रेस मध्ये एकच गट असला तरी अॅड. संदिप भैय्या पाटील यांच्या नेतृत्वात या पक्षाला जणू क्षय झाला आहे. की काय असे वाटते त्यामुळे आजमितीस चोपडा तालुक्यात असा एकही नेता वा पुढारी नाही जो मतांची फार मोठी बेगमी करू शकेल. छाती ठोकपणे असे कुणीही सांगू शकत नाही की मी अमूक एक उमेदवाराला निवडून आणेल….!
माजी खासदार विजय नवल पाटील यांची निवडणुक आठवते त्यावेळी चोपडा तालुका एरंडोल लोकसभा मतदार संघात होता. पाटील हे इथल्या राजकीय नेत्यांबरोबर कधीच प्रचारात दिसत नव्हते फक्त कार्यकर्ते तेवढे फिरायचे आज ती स्थिती बदलली आहे. पक्षनिष्ठ ध्येय राष्ट्राभिमान हे शब्द चिकणे व गुळगुळीत झाले आहेत जो जास्त पैसा पेरेल तोच अधिक मतं घेईल. घराणेशाही जोपासतांना पक्षाकडून फुकटात मतं मिळविण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत याचा टका त्याचाच ठेका अस भलेभले मतदार बोलतात . उमेदवार संख्येने कमी आहेत, मत विभाजनाचा प्रश्नच नाही जातीय समीकरणात लेवा पाटीदार समाजाची मते निर्णायक आहेत अशा परिस्थितीत रावेरची जागा आपल्याकडे कोण खेचून घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
लोकशाही वार्तापत्र
रमेश पाटील
चोपडा