लासुर ता.चोपडा(वार्ताहर) :-चोपडा तालुक्यातील दिवसेंदिवस कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असून अश्या परिस्थितीत इ-पॉस मशिनवर अंगठा घेऊन धान्यवाटप करणे शक्य नसून दुकानदारांच्या तसेच नॉमिनीच्या अंगठे घेऊन इ-पॉस द्वारे धान्यवाटप करण्यास परवानगी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रेशन दुकानदारांच्या वतीने तहसीलदार अनिल गावित यांना प्रत्यक्ष तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना ई-मेल द्वारे देण्यात आले.
मागील वर्षापासून कोरोना रोगाचे संक्रमण सुरू असून काही महिन्यांपूर्वी रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाच्या धोरणाप्रमाणे इ-पॉस मशीनवर ग्राहकांचे अंगठे घेऊन धान्य वाटप केले परंतु पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव दुप्पट वेगाने पसरत असून ग्राहक भितीपोटी अंगठा देण्यास स्वयंस्फूर्तीने तयार होत नाही परिणामी धान्य वाटपाची टक्केवारी कमी होते तरी इ-पॉस मशिन वर दुकानदारांचे अंगठे घेऊन धान्यवाटपास शासनाने परवानगी द्यावी तसेच कोरोना रोगाने बरेच रेशन दुकानदारांना ग्रासले होते म्हणून त्वरित विमासंरक्षण मिळून रेशनदुकानदारांना लसीकरण करण्यात यावे अशी मागणी रेशन दुकानदारांच्या वतीने रास्तभाव दुकानदार संघटना तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी केली आहे.
चोपडा तालुक्यात दिवसागणिक कोरोना प्रादुर्भाव वाढत असून अश्या परिस्थितीत ग्राहकांचे अंगठे घेऊन धान्यवाटप शक्य नाही तरी शासनाने दुकानदारांच्या अंगठ्याने धान्य वाटपास परवानगी द्यावी-विकास पाटील (चोपडा तालुकाध्यक्ष रास्तभाव दुकानदार संघटना)