कामात कुचराई केल्याचा आरोप : चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी
जळगाव, दि. 30 –
जिल्ह्यात 14 तालुक्यांमध्ये शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पार पडली. मात्र चोपडा तालुक्यातील गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे येथील शिक्षकांचे समायोजन अद्यापही रखडले आहे, असा आरोप जि.प.सदस्य नाना महाजन यांनी स्थायी समितीच्या सभेत केला. तसेच कामात कुचराई करणार्या गटशिक्षणाधिकार्यांची चौकशी करुन प्रशासकीय कारवाईची मागणीही महाजन यांनी केली आहे.
जि.प. स्थायी समितीची सभा बुधवारी साने गुरुजी सभागृहात पार पडली. याप्रसंगी जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिक्षण सभापती पोपट भोळे, समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, आरोग्य सभापती दिलीप पाटील, महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, एसीईओ संजय मस्कर, शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, मधुकर काटे आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे नाना महाजन यांनी शिक्षक समायोजनांमधील घोळ प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरले. शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी पारोळा तालुक्यातील वात्सर शाळेभोवती झालेले अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या. कैलास सरोदे यांनी रावेर तालुक्यातील वाघोदा खु.येथील शाळेभोवतीचे अतिक्रमण काढण्याची मागणी केली. तसेच उदळी येथील पाणी पुरवठा जलकुंभाचा अहवाल मागितला असता या जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून गावास पाणी पुरवठा करण्यात आला आहे. परंतु जलकुंभ गळतीमुळे दुरुस्तीसाठी 10 टक्के रक्कम राखून ठेवण्यात आली असल्याचा अहवाल पाणी पुरवठा विभागातर्फे सादर करण्यात आला.
वर्ग खोल्यांचे काम रखडले
भडगाव तालुक्यातील भोरटेक येथील जि.प. शाळेत गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात वर्ग खोल्या पडल्या होत्या. यात काही विद्यार्थी देखील जखमी झाले होते. या खोल्यांच्या बांधकामासाठी 20 लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र संबंधीत ठेकेदाराकडून काम पूर्ण करण्यात आलेले नसल्यामुळे त्याच्यावर कारवाईची मागणी शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील यांनी केली. तसेच चिंचपुरे येथील भिल्ल समाजातर्फे घरकुलाच्या मागणीसाठी पंचायत समितीसमोर उपोषण करण्यात आले होते. येथील घरकुलाच्या यादीत घोळ झाला असल्याचा मुद्दा रावसाहेब पाटील यांनी उपस्थित केला असता चौकशीचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले.
आरोग्य केंद्राची तपासणी
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मानवविकास तसेच राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम दरमहा राबविण्याचे शासनाचे आदेश असताना या केंद्रांमार्फत या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या केंद्रांच्या तपासणीची मागणी राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे यांनी केली.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.