भातखंडे (प्रतिनिधी) : ऊन्हातान्हात पत्र्याच्या चुलींचं ओझं डोक्यावर घेऊन, वयाच्या ८० व्या वर्षी पायी चालणाऱ्या या आजी स्वावलंबी जीवन जगतायेत. रस्त्याच्या कडेला झोपडीवजा टेंटमध्ये स्वयंपाकापुरतं सामान व दैनंदिन वापरायचे कपडे ऐवढाच काय तो संसार ! आयुष्यभर गावोगावी फिरत हाच व्यवसाय करतायेत. दारुमुळे नवरा तर आजारपणात दोघे मुले गेलेत .लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आली. रेशनकार्ड, आधारकार्ड काहीही नाही. कोणतीही सरकारी मदत नाही, पण तरीही स्वाभामानी जगणं ! आयुष्यात खूप कठीण काळ आला पण कधी भिक मागीतली नाही ,कोणत्याही मंदीराच्या बाहेर जाऊन बसली नाही.
चूल विकणाऱ्या ह्या नर्मदा आजीची करून कहाणी यंग फाउंडेशनचे युवक सेवक संदीप विनायक देवरे दोंडावाडकर यांनाही नर्मदा जी धुळे येथील पारोळा रस्त्यावरील चौफुलीवर अलीकडेच भेटली असता तिला मदतीसाठी विनंती केली तुम्हाला काही मदत हवीय का? असं विचारल्यावर ” पडेल ते काम करायचं अन् पोट भरायचं पण फुकटचं ,चोरीचं अन् भिकेचे जगणं नको ” असं ही नर्मदा आजीनं ठासून सांगीतलं. लिहीता – वाचता न येणारी ,अतिशय बिकट परिस्थितीत एकाकी जीवन जगणाऱ्या या म्हातारींने स्वाभिमानी व स्वावलंबी जगण्याचा वस्तुपाठच जणू मांडला. कोणतेही फोटो घेऊ नका असं सांगत म्हातारी चालती झाली, नर्मदा नदीप्रमाणे अनेक अडथळे पार करत प्रवाही प्रवास ,करणारी नर्मदा आजी ,बरच काही शिकवून गेली.
लॉकडाऊन काळात बरेच लोक मदत मागतात पण असेही लोक भेटतात की ,जे गरज असुनही मदत मागत नाहीत . ते मदत मागायला संकोचतात,कारण उभं आयुष्य काबडकष्ट करुन,स्वाभिमानाने जगणारे हे लोक ,मदत नको हाताला काम द्या, असंच सांगतात . घरकाम करणाऱ्यां महीला व मजुरी ,हमाली ,व इतर कष्टाची कामं शहरांमध्ये जवळजवळ बंदच आहेत. या असंघटीत मजुरांना रेशन सोडलं कोणतीही सरकारी मदत नाहीये. शासन पातळीवर या लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न होणं अत्यंत गरजेचे आहे. आपणही आपल्याकडून शक्य तेवढी मदत अशा ,संकोचलेल्या कष्टकरींना करुयात !
कवी वसंत बापट ,कष्टकरींसाठी म्हणतात,
आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही !
इमान आम्हा एकच ठावे,घाम गाळूनी काम करावे
मार्ग वेगळा नाही ,आम्हा स्वर्ग वेगळा नाही !!
आपला लढा कोरोनाशी आहे ,कोरोनाग्रस्तांशी नव्हे !

