चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी

0

नवी दिल्ली ;– देशभरात अल्पवयीन चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॉस्को कायद्यात बदल करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षाखालील चिमुरड्यांसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पॉस्को कायद्यात बदल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. अल्पवयीन चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्कारासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने लिखीत उत्तर दिलं. गेल्या अनेक वर्षांपासून चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत आहे. सर्वोच्च न्यायालय २७ एप्रिलला पुढील सुनावणी करणार आहे.

जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून संताप व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही कठुआ बलात्काराची चर्चा सुरु आहे. अल्पवयीनांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य लोक करत आहे. दरम्यान केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी कठुआ बलात्कारावर बोलताना, या घटनेमुळे आपण अत्यंत हादरलो असून, अल्पवयीन मुलींसोबत बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आपलं मंत्रालय पॉस्को कायद्यात बदल करत असल्याचं सांगितलं होतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.