चित्रकार दृश्यानुभव पाहून चित्र रंगवतात!

0

खान्देश नाट्य महोत्सवाला प्रतिसाद : विजय जैन यांनी घेतली चित्रकारांची मुलाखत

भुसावळ, दि. 3 –
कुटुंबातील प्रत्येकाची लढण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्या भोवताली असलेला जनक नावाचा राक्षस आपल्याला कसा नामोहरम करतो हे अप्रतिम सादरीकरणातून नाट्यरसिकांना जनक या नाटकाद्वारे अनुभवायला मिळाले. त्याचबरोबर दोन चित्रकारांच्या मुलाखतीतून अनुभव ऐकण्यास मिळाले.
भुसावळ येथील श्रीकृष्णचंद्र सभागृहात सुरू असलेल्या स्वर्गीय नानासाहेब देविदास गोविंद फालक स्मृती प्रायोगिक खान्देश नाट्य महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी दि. 2 रोजी सायंकाळी परिवर्तन साक्षरता चित्रप्रदर्शनात लावण्यात आलेल्या चित्रांचे रेखाटन करणार्‍या चित्रकार राजू बाविस्कर व विकास मल्हारा यांची मुलाखत विजय जैन यांनी घेतली. त्यानंतर दशमी क्रिएशन मुंबई निर्मित जनक नाटकाचा प्रयोग रंगला. नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
निराकारात आकार शोधण्यापेक्षा अनुभवा रंग आणि पोत – अमूर्त चित्रे पाहायची म्हणजे नेमके काय पाहायचे हा एक स्वतंत्र विषय आहे. निराकारात आकार त्यात रंग व पोत अनुभवायचे असतात. रंगहीन स्थिती म्हणजे काळे-पांढरे असणे. पोत जसे स्पर्शाने समजते तसे ते डोळ्यांना देखील जाणवते. ते या अमूर्त चित्रांमधून उलगडते. ही शब्दांच्या पलीकडची अनुभूती अमूर्त असते. साधारणपणे चित्रकार वस्तू, सभोवतालच्या जगाचा दृश्यानुभव पाहून रंगवत असतात. असा दृश्यानुभव दर्शवणार्‍या चित्रांना अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हटले जाते. अशा चित्रांविषयी धीरगंभीर प्रकारे आध्यात्मिक भाषेत बोलले जाते. अर्थातच जाणीवपूर्वक न पाहिलेल्या, न माहित असलेल्या, अपरिचित अशा दृश्यानुभवांचा शोध घेणे, त्याकरिता चित्र घडवत राहणे, रंगवत राहणे या भूमिकेला महत्त्व असल्याचे ते म्हणाले. वास्तववादी चित्रशैलींचा आणि चित्रकाराच्या वैचारिक अस्वस्थतेचा, मंथनाचा संबंध लागत नाही. अशातूनच तो अपरिचित दृश्यानुभवाकडे, त्यांना शोधण्याकडे वळतो. यातून रंगलेपनातून सापडणारे अनपेक्षित दृश्यानुभव व आपली वैचारिक भूमिका यात चित्रकार संबंध शोधू लागतो. अशा प्रकारे अमूर्त चित्रकलाविषयी चित्रकार राजू बाविस्कर व विकास मल्हारा यांनी सांगितले.
संघर्षमय जीवनाचे सादरीकरण
शार्दूल सराफ लिखीत व दिग्दर्शित जनक नाटकाचा प्रयोग रंगला. संगीत प्रणव बडवे, प्रकाश अमोघ फडके, निर्मिती प्रमुख अपर्णा गोखले, नेपथ्य अजय पुजारे, मंचवस्तू चिन्मयी स्वामी, ऋतुजा गद्रे, मोहित कुंटे यांची होती. कलाकार म्हणून अनिल रसाळ, अनिता दाते, आरती मोरे, आनंद पाटील, अंकुश काणे यांनी भूमिका बजावली.

Leave A Reply

Your email address will not be published.