मुंबई : राज्यातील करोनाग्रास्तांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. महाराष्ट्रात करोनानं कम्युनिटी ट्रान्समिशनद्वार पसरण्यास सुरूवात केली आहे. देशातील अनेक भागात करोना तिसऱ्या टप्प्यावर पोहोचला असून, यात मुंबईचाही समावेश आहे,” अशी माहिती दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. कम्युनिटी ट्रान्समिशनद्वारे करोना पसरत असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे मुंबईकरांच्या आणि राज्य सरकारच्या चिंतेत आणखी एका संकटाची भर पडली आहे.
देशात गेल्या आठवडाभरात करोनाचा संसर्ग वेगानं फैलावला आहे. देशातील करोनाग्रस्तांची आकडेवारी चार हजारांच्या पुढे गेली असून, मृतांची संख्याही १०९ झाली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण असून, दिवसागणिक त्यामध्ये वाढ होत चालली आहे. राज्यात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असताना कम्युनिटी ट्रान्समिशनद्वारे करोनानं चंचुप्रवेश केला आहे.
काही ठिकाणी करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा अचानक वाढल्याने कम्युनिटी ट्रान्समिशन होत असल्याचंही दिसून आलं आहे. मुंबई शहरात हे दिसलं आहे. देशातील करोनाची सद्यस्थिती दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. देशात कम्युनिटी ट्रान्समिशन झालेली ठिकाण आहेत. मात्र, कम्युनिटी ट्रान्समिशनमधून पसरणाऱ्या करोनाला पहिल्या टप्यातच रोखलं तर काळजी करण्यासारखी स्थिती निर्माण होणार नाही. त्यासाठी दक्ष राहणार आवश्यक झालं आहे,” असं डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं. ‘आज तक’च्या हवाल्यानं इंडिया टुडेनं हे वृत्त प्रकाशित केलं आहे.