नवी दिल्ली : देशातील कोरोना नियंत्रणाबाहेर गेल्याचे आकडेवारी दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत आढळून येत आहे. आज पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंद करत गेल्या २४ तासात देशात सव्वा लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशात १ लाख २६ हजार ३१५ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर ६८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडण्याची देशात गेल्या चार दिवसातील ही तिसरी वेळ आहे. याआधी मंगळवारी १ लाख १५ हजार रुग्णांची नोंद झाली होती. म्हणजेच गेल्या दोन दिवसात २ लाख ४० हजार रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात राज्यात तब्बल ३२२ करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा ५६ हजार ६५२ वर गेला. तसंच २४ तासांत राज्यात ५९ हजार ९०७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. या सर्व परिस्थितीमध्ये राज्यात आज ३० हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत ही दिलासादायक बाब ठरली.
राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत राज्यात ३१ लाख ७३ हजार २६१ करोना बाधित सापडले आहेत. त्यापैकी सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख १ हजार ५५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी, २१ हजार २१२ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्याचा मृत्यू दर १.७९ टक्के इतका असल्याची नोंद झाली आहे.
दिल्लीतही पाच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी महाराष्ट्रात ५९ हजार ९०७, दिल्लीत ५ हजार ५०६, उत्तर प्रदेशात ६०२३ आणि कर्नाटकात ६९७६ रुग्णांची नोंद झाली.