मुंबई : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.दरम्यान, यात मुंबईची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. मुंबईतील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण हे देशाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी जास्त आहे. हे प्रमाण देशात सरासरी ३ टक्के आहे, तर मुंबईत १५ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं यावर काळजी व्यक्त केली आहे.
देशातील सर्वाधिक करोनाचे रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. कोरोनामुळे मुंबईचे प्रचंड हाल होताना दिसत आहे.
मुंबईतील परिस्थिती काळजी करण्यासारखी झाली आहे. देशात १२,७६,७८१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात ५०००० जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. म्हणजे देशातील पॉझिटिव्ह रूग्णांचं प्रमाण सध्या ३ टक्के आहे. दुसरीकडं मुंबईत ७३ चाचण्या करण्यात आल्या असून, ११००० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. म्हणजेच मुंबईतील करोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांचं प्रमाण १५ टक्के आहे,” अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या करण्याची सूचना आरोग्यमंत्र्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. या सगळ्यांमध्ये दिलासादायक बाब म्हणजे मुंबईसह देशात कुठेही अजून कम्युनिटी ट्रान्समिशन झालं नसल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.