चिंताजनक बातमी ! देशातली आतापर्यंतची कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर

0

मुंबई : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. महिन्याच्या सुरुवातीलच कोरोनाची रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर आली आहे. जुलैच्या अखेरीस 50 ते 53 हजार दिवसाला नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्यानंतर आता गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासात 57 हजार 117 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली तर गेल्या 24 तासांत 764 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आलं होतं. लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी अनलॉक करण्यात आले आहे. देशात आजपासून अनलॉक ३ ची प्रक्रिया सुरु आहे. देशात बंद पडलेले व्यवहार सुरू झाले आहे. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 लाख 95 हजार 988 वर गेला आहे. तर आतापर्यंत मृतांचा आकडा 36,511 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 10 लाख 94 हजारहून अधिक लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर देशात 5 लाख 65 हजार 103 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रातील रूग्णालयात एक लाखाहून अधिक संक्रमित लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर तामिळनाडू, तिसर्‍या क्रमांकावर कर्नाटक, चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आणि दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे.

जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत 2.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून महिन्याच्या अखेरीस देशात करोनाबाधितांची संख्या 4 लाखांच्यावर होती. तर दुसरीकडे जून महिन्याच्या तुलनेत मृतांची संख्यादेखील 1.6 टक्क्यांनी वाढली आहे. जून महिन्याच्या अखेरीस करोनामुळे झालेल्या मृतांची संख्याही 11 हजार 988 इतकी होती. जुलै महिन्यात करोनानं इतका वेग पकडला की अखेरच्या 15 दिवसांमध्ये तब्बल 7.3 लाख रुग्णांची नोंद करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.