चिंताजनक ! ट्रकच्या कोरोनाबाधित क्लिनरने केला नांदुरा, यावल व्हाया मुक्ताईनगर प्रवास

0

जळगाव /बुलडाणा (गणेश भेरडे ) : जीवापेक्षा आंबे अधिक महत्वाचे आहेत का ? हा प्रश्न त्या नागरिकांनी स्वतःला विचारायचा आहे, जे बाहेर गावाहून घरी आंब्याची डिलीव्हरी मागविण्यासाठी धडपडत आहेत. आंध्रप्रदेशमधील ट्रकचालक आणि त्याचा क्लिनर तीन दिवसांपूर्वी नांदुरा येथील व्यापार्‍याकडून आंब्याच्या मालाची ऑर्डर घेवून गेले. आंब्याचा हा ट्रक घेवून आलेला चालकसोबतचा क्लिनर कोराना पॉझिटीव्ह असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून आदिलाबाद (राज्य आंध्रप्रदेश) पोलिसांनी या दोन्ही कोरोना बाधितांना ताब्यात घेतलेले आहे. तेथील प्रशासनाकडून ही माहिती मिळाल्यानंतर नांदुरा येथील व्यापारी आणि त्याचे कुटूंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याव्यतिरीक्त आणखी तिघे जण या ट्रकच्या संपर्कात आल्याने त्यांनाही होम क्वारंटाईन करण्यात आल्याची पक्की माहिती लोकशाही मिळाली आहे.

आंध्रप्रदेशमधील विजयवाडा येथे राहणारा एक ट्रकचालक आणि त्याचा सहकारी 15 एप्रिल रोजी आंब्याचा ट्रक घेवून निजवीड या गावावरून बाळापूर (अकोला) येथे दूसर्‍या दिवशी सायंकाळी 4 वाजेदरम्यान पोहोचला. याठिकाणी दोघांनी आंबे उतरविले. त्यानंतर सायंकाळी 7 वाजेदरम्यान ते नांदुरा येथे पोहोचले. नांदुरा येथील एका व्यापार्‍याकडे (वय 58 वर्षे) दोघेही पोहोचले. या व्यापार्‍याकडून दोघांनी पुढील मालाची पास बनविली व पैसे घेतले. पुढे हा ट्रकचालक आणि क्लिनर त्याच रात्री मुक्ताईनगर येथे मुक्कामी थांबले. 17 एप्रिल रोजी भुसावळ मार्गे यावल येथ गेले. यावलमधून कांदा ट्रकमध्ये भरून रवाना झाले. या दोघांनाही 18 एप्रिल रोजी म्हणजे काल सकाळी 9 वाजेदरम्यान आदिलाबाद येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांपैकी ट्रकचालकाचा सहकारी म्हणजेच क्लिनर पॉझिटीव्ह असल्याचे आंध्रप्रदेश सरकारने कळविले आहे. या क्लिनरच्या हिस्ट्री ट्रॅकिंगमध्ये नांदुर्‍याचा व्यापारीही आला आहे. त्यामुळे नांदुर्‍याचे हे व्यापारी आणि त्यांचे संपूर्ण कुटूंबीय होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. नांदुरा तहसीलदारांनी यानंतर तातडीने कार्यवाही करीत संबंधीत क्लिनरच्या संपर्कात आलेल्या नांदुर्‍यातील एकणु 9 जणांना, ज्या व्यापार्‍याच्या कुटूंबातील 6 सदस्य आहेत, त्यांना खामगांव येथे तपासणीसाठी पाठविले. हे सर्व जण आता होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. जर यापैकी कुणीही संसर्गीत झाले असेल तर बुलडाणा जिल्ह्याच्या चिंतेत भर पडल्याशिवाय राहणार नाही.

कोरोना विषाणू फळांवर तीन तासांपेक्षा अधिक वेळ सक्रिय राहतो. केवळ आंब्यांच्या ऑर्डरसाठी आंधप्रदेशमधील हा कोरोना संसर्गीत नांदुर्‍यापर्यंत पोहोचला. म्हणून सावधान, तुमच्याकडे एखादा कोरोनाग्रस्त ‘कोरोना आंबा’ तर येत नाही ना, याची खातरजमा करा.

Leave A Reply

Your email address will not be published.