चाळीसगाव तालुक्यात वाळू चोरीचा कहर ; जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी पथकांची नेमणूक करावी

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : सध्या कोरोना सारख्या आजाराने सर्व जण भयभीत झाले आहेत शासकीय व महसूल यंत्रणा या कामात लागली असतांना याचा फायदा वाळू चोरट्यांनी घेतला असून गिरणा नदीपात्रातुन मोठया प्रमाणात रात्रीच्या सुमारास वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे महसूल विभागाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वाळू चोरट्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा प्रकोप वाढल्याने शासकीय यंत्रणा त्यात अडकली आहे  त्याचा फायदा वाळू माफिया गिरणा नदीपात्रातून सर्रास वाळू चोरी करत आहेत. गिरणा नदीपात्र अक्षरशः ओरबाडून काढत आहेत  रात्रंदिवस ओमनी, ट्रॅक्टर, बैलगाडी व इतर वाहनांद्वारे वाळू उत्खनन करून वाहतुक केली जात आहे.  शासनाचे चाळीसगाव तालुक्यातील गिरणा पात्रात कुठेही वाळूचे लिलाव केले नसतांना तालुक्यात व शहरात मोठया प्रमाणात वाळू विक्री होत आहे.

महसूल विभागाचे गस्ती पथक रात्रीच्या सुमारास तालुक्यातील महत्वाच्या गावात फिरत असताना वाळू चोरी होते कशी हा सवाल आता उपस्थित होत आहे, कोरोनाचा प्रकोप सुरू असताना देखील तालुक्यासह चाळीसगाव शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत या बांधकामांवर सरासरी 7 ते 8 हजार रुपये ट्रॅक्टर ट्रॉली भरून वाळू विक्री होत असल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे मागेल त्याला मुबलक वाळू या वाळू माफियांकडून बिनधास्तपणे पुरवली जात आहे. शहरातील कुठल्याही भागात पाहिजे तेवढी वाळू मुबलक पणे मिळत असल्याने चाळीसगाव तालुक्यात वाळू माफियांचे राज्य आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

चाळीसगाव शहरात वाळूचे ट्रॅक्टर व ओमनी येण्यासाठी सोपा व एकमेव मार्ग म्हणजे रेल्वे उड्डाण पूल आहे ईतर मार्गाने देखील वाळू शहरात दाखल होते पण उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजुला महसूल प्रशासनाने सी सी टी वही कॅमेरे बसवल्यास त्याचा निश्चित फायदा होऊन वाळू चोरट्यांवर वचक बसेल शिवाय शहरात कुठे चोरी झाली असेल तर चोरटे कोणत्या गाडीतून पळाले हे देखिल पोलीस प्रशासनाला दिसून तपासात त्याचा फायदा होऊ शकतो शिवाय कन्नडरोड बायपास, खडकी बायपास, खराजई नाका, बिलाखेड बायपास याठिकाणी महसूल पथकाच्या गस्त वाढविल्यास व याठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यास चोरटी वाळू वाहतुकीवर नियंत्रण मिळू शकते याचा महसूल प्रशासनाने विचार करावा व जिल्हाधिकारी यांनी भरारी पथके नेमून वाळू चोरीला आळा घालावा अशी मागणी आता होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.