Saturday, January 28, 2023

चाळीसगाव तालुक्यातील भाजपत गटबाजीचा स्फोट

- Advertisement -

जळगाव जिल्हा भाजपत खा. रक्षा खडसेंना पक्षाकडून संघटनेत झुकते माप दिले जात असल्याने रक्षा खडसे व गिरीश महाजन अशा गटबाजीला चर्चेचे उधाण आले होते. या चर्चेचे गुऱ्हाळ शमते न्‌ शमते तोच चाळीसगाव शहर भाजपचे अध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी भाजपचे खा. उन्मेष पाटील यांचेवर लेटर बॉम्ब टाकून खा. उन्मेश पाटील हे चाळीसगाव तालुक्यातील भाजपमध्ये गटबाजी करताहेत असा केला. इतकेच नव्हे तर विरोधकांशी हात मिळवणी करून भाजपला जोडोऐवजी भाजप छोडोची कृती करताहेत असा थेट आरोप शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांना खासदारावर केला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील लसीकरणाच्या शिबीराच्या माध्यमातून भाजपतील गटबाजी जाहीर झाल्याचा आरोपही घृष्णेश्वर पाटील यांनी केला आहे. त्यामुळे घृष्णेश्वर पाटलांच्या लेटर बॉम्बमुळे खा. उन्मेश पाटलांना जणू घरचा आहेर मिळाला आहे. त्यातच घृष्णेश्वर पाटील हे 2014 विधानसभा निवडणुकीपासून खा. उन्मेश पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. 2014 विधानसभा निवडणुकीत त्यानंतर 2019 च्या खासदारकीच्या निवडणुकीत तन – मन -धनाने जीवाचं रान करून उन्मेश पाटलांच्या प्रचारात सहभागी होते. त्यामुळे घृष्णेश्वर पाटलांनी केलेल्या लेटर बॉम्बमुळे चाळीसगाव तालुक्यातील भाजपमध्ये खळबळ उडणे साहजिक म्हणावे लागेल.

2019 च्या विधानसभा मतदारसंघात खा. उन्मेश पाटलांच्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून उत्सुक होते. विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे खा. उन्मेश पाटलांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते होते. खा. उन्मेश पाटलांना चाळीसगाव तालुक्यातून प्रचंड मताधिक्य मिळावे म्हणून आ. मंगेश चव्हाणांनी घेतलेली मेहनत सर्वश्रृत आहे. परंतु 2019 च्या विधानसभेसाठी उमेदवार निवडीचा प्रश्न आला तेव्हा खा. उन्मेश पाटलांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता. त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याऐवजी आ. मंगेश चव्हाणांना उमेदवारी मिळाली आणि तिथे माशी शिंकली. आ. मंगेश चव्हाण हे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक आहेत. खा. उन्मेश पाटील सुध्दा गिरीश महाजनांचेच कट्टर समर्थक होते. ते गिरीश महाजनांचे कट्टर समर्थक असल्यानेच माजी आमदार स्मिता वाघ यांची जाहीर झालेली जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवारी ऐनवेळी रद्द करून खा. उन्मेश पाटलांसाठी उमेदवारी खेचून आणली. त्यावेळी महाराष्ट्रभर हा प्रश्न गाजला. कारण स्मिता वाघ यांनी प्रचारांच्या नारळही फोडला होता. परंतु गिरीश महाजनांनी उन्मेश पाटलांसाठी केलेले हे प्रयत्न उन्मेश पाटलांनी सहजगत्या विसरून लोकसभेच्या निवडणुकीतील विजयामुळे ते हवेत तरंगू लागले आणि पत्नीसाठी विधानसभेची उमेदवार मिळावी म्हणून शह -काटशह देणे सुरू केले. परंतु आ. मंगेश चव्हाणांची उमेदवारी जाहीर होताच उन्मेश पाटील कमालीचे नाराज होऊन विधानसभा निवडणुकीत मंगेश चव्हाण पडतील कसे अशी अंतर्गत व्ह्यूवरचना केल्याचा आरोप आता शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटलांपासून ते अनेक कार्यकर्ते करताहेत. त्यामुळे आता चाळीसगावात भाजपत सरळ सरळ दोन गट पडले असून आमदाराच्या गट व खासदाराचा गट म्हणून संबोधले जाते. त्याला शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटलांनी केलेल्या आरोपामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

- Advertisement -

विधानसभेची निवडणूक झाल्यापासून खा. उन्मेश पाटील आणि आ.मंगेश चव्हाण यांची कामाची वाट वेगवेगळीच झाली आहे. खा. उन्मेश पाटील आणि आ.मंगेश चव्हाण एकाच भाजप पक्षाचे जरी असले तर त्या आधी ते कट्टर मित्र होते. परंतु आता दोघे एका पक्षाचे असले तरी दोघांची तोंडे एकमेचांविरूध्द दिशेला आहेत हे मात्र निश्चित. भाजप पक्षसंघटनेचे शहर स्तरावर अथवा तालुक्यात कार्यक्रम असतील तेवढ्या पुरते हे दोघे जण एकाच व्यासपीठावर येतात. त्यानंतर ते कधीच एकत्रितपणे कार्यक्रमाला दिसत नाहीत.

चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुराने थैमान घातले. अनेक गावातील पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरे उद्ध्वस्त झाली. जनावरे वाहून गेली. यावेळी आ. मंगेश चव्हाण आणि गिरीश महाजन प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पहाणी केली. पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्हा पालकमंत्र्यांसोबत या दोघांनी पहाणी दौरा केला. शेतकऱ्यांचे सांत्वन केले. मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. परंतु खा. उन्मेश पाटलांनी मात्र कोठे दौरा केल्याचे दिसले नाही. केले असतील तर ते एकटे गेले असतील. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यात छुपे नव्हे तर उघड उघड आमदार आणि खासदारात संघर्ष असल्याचे जाणवते. त्यातच तालुक्यातील लसीकरण मोहिमेत ते स्पष्ट झाले आहे. खा. उन्मेश पाटलांपेक्षा आ. मंगेश चव्हाण यांच्या कामाचा सपाटा जोरात आहे. आपल्या जळगाव लोकसभा मतदार संघात सुध्दा खा. उन्मेश पाटलांचा प्रभाव दिसून येत नाही. अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. त्याबद्दल खासदा म्हणून उन्मेश पाटील काही विशेष प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी ही गटबाजी आणि खा. उन्मेश पाटलांची भूमिका पक्षासाठी धोक्याची घंटाच ठरणार आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे