चाळीसगाव :- शहरातील नगरपालिका मंगल कार्यालय भागात घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील एक लाख रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जहिरोद्दीन सिराजुद्दीन शेख हे ईद साजरी करण्यासाठी आपल्या जुन्या घरी वडिलांकडे गेल्याने घराला कुलूप होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कंपाउंड व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली एक लाख रुपयाची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. दरम्यान, शेख जहिरोद्दीन यांनी आपल्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर शेख कलीम यांना 2 लाख रुपये घेऊन ताबेगहाण दिला होता. याची रक्कम 1 लाख रोख व 1 लाखांचा चेक त्यांना मिळाल्याने लाख रुपये रोख ऐवज त्यांच्या घरात होता, असे त्यांनी पोलिसात फिर्याद देतांना सांगितले आहे. हीच रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. दरम्यान, याबाबत चाळीसगाव पोलिसात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.