चाळीसगाव :-(प्रतिनिधी )- कुटुंब बाहेरगावी आणि कुटुंबप्रमुख तिरूपती बालाजीच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्याने घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले 60 हजार रुपये रोख व सोने, चांदीचे दागिने असा एकूण 3 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना शहरातील नारायण वाडीमध्ये घडली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी सिव्हिल इंजिनीअर निलेश सुवालाल कांकरिया (३७ ) रा. जेता क्लासेस समोर, नारायण वाडी चाळीसगाव यांचे कुटुंब बाहेरगावी गेले असल्याने ते घरी एकटेच होते.दि.२७ नोव्हेंबर रोजी घराला कुलूप लावून पहाटे ६ वाजता मित्रांसोबत तिरुपती बालाजी मंदिर येथे दर्शनास गेले होते.दि 28 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांचे शेजारच्यांनी मोबाईलवर त्यांना सांगितले की, त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असून घरात चोरी झाली आहे. माहिती मिळाल्यानंतर निलेश कांकरिया यांनी तात्काळदुपारी 3-30 वाजता घरी आले त्यावेळी त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले व घरात सामान अस्ताव्यस्त होते तर बेडरूम मधील कपाटात ठेवलेले 60 हजार रूपयांची रोकड व 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, 1 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा 3 लाख 10 हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. कांकरिया यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून चोरीची माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे करीत आहेत.