जळगाव – दुचाकींचा कट लागल्याने जाब विचारला असता दोन्ही आरोपींनी चाकूचा वर करून प्राणघातक वार केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश जी. ए. सानप यांनी दोघा आरोपीना दोषी ठरवीत 16 रोजी 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा आरोपीना भोगावी लागणार आहे.
2 जानेवारी 2014 रोजी जळगाव शहरातील बालाजीपेठ येथील रहिवाशी संतोष भगवान पाटील हे दुचाकीने दुपारी 3. 45 वाजेच्या सुमारास राधाकृष्ण नगर दूध फेडरेशन मार्गे पाळधी येथील मंदिरात दर्शनासाठी जात असताना दारूच्या नशेत असणारे आरोपी मनोज उर्फ मन्या रामचंद्र सपकाळे आणि राहुल उर्फ बबलू रामचंद्र सपकाळे रा. शनिपेठ जळगाव यांनी दुचाकीने कट मारला . तेव्हा फिर्यादीने गाडी हळू चालवा असे सांगितल्याचा राग आल्याने दोघा आरोपींची फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकूने छाती व पोटावर प्राणघातक हल्ला केला . फिर्यादी संतोष पाटील यांनी याबाबत शहर पोलीस स्टेशनला आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासी अधिकारी सार्थक नेहते यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सहाय्य्क सरकारी अभियोक्ता निलेश चौधरी यांनी 7 साक्षीदार तपासले. यात तपासाधिकारी नेहते यांचा जबाब महत्वाचा ठरला. त्यांनी यासाठी जोरदार युक्तिवाद केला. बचावपक्षाचे वकील डी. जे. पाटील यांनी शिक्षा माफ करावी व त्यांना सुधारण्याची संधी देण्याची विनंती न्यायालयास केली . मात्र हि विनंती फेटाळून लावल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपीना शिक्षा सुनावली आहे.