चंद्रपूर – बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे होणार आहे. बांबूपासून या केंद्राची इमारत ही बनविण्यात येणार आहे. अशाप्रकारे बांधली जात असलेली ही आशिया खंडातील पहिली इमारत असून, देशातील हे पहिले बांबू संशोधन केंद्र असणार आहे.
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची चंद्रपुरात स्थापना वनविभागाच्या वतीने २०१४ मध्ये झाली. युवक-युवतींना या केंद्रामध्ये बांबूपासून निर्माण होणा-या विविध कलाकृतींचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच राज्यातील विविध बांबूच्या प्रजातींवर येथे संशोधन केले जाणार आहे. हे केंद्र सध्या छोट्या स्वरुपात चंद्रपुरात सुरू करण्यात आले आहे. पण ते पूर्णरुपात सुरू होण्यासाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
हे बांबू केंद्र चंद्रपूरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या चिचपल्ली येथे आकार घेत आहे. हे केंद्र तीन एकर जागेत तयार होत असून, यात प्रशिक्षण इमारत, प्रशासकीय इमारत, अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि वसतिगृहे असणार आहेत. यातील प्रशिक्षण इमारत आणि प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हे पूर्णपणे बांबूचे आहे. यासाठी आसाम आणि बंगालमधील सिलिगुडी येथून बांबू मागवण्यात आले आहेत. या दोन्ही इमारती पर्यावरणपूरक असून यावरील छतसुद्धा वेगळ्या पद्धतीचे असणार आहे.