नवी दिल्ली : सर्वसामान्यांचे बजेट पुन्हा एकदा कोलमडणार आहे. कारण घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून सलग पाचव्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. इंडियन ऑईलनं विना अनुदानित १४ किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४४.५० रुपयांपासून १४९ रुपयांपर्यंत वाढ जाहीर केलीय. ही वाढ आजपासून लागू झालीय. यापूर्वी, १ जानेवारी २०२० रोजी घरगुती गॅसच्या किंमतींत वाढ घोषित करण्यात आली होती.
मुंबईमध्ये गॅस सिलेंडरच्या दरात 145 रुपयांनी वाढ झाली असून तो 829.50 रुपायांना मिळणार आहे. तर राजधानी दिल्लीत सिलिंडरच्या किंमतीत १४४.५० रुपयांची वाढ करण्यात आलीय. दिल्लीत आता १४ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी ८५८.५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर कोलकातामध्ये गॅस सिलेंडरच्या दरात 149 रुपयांनी वाढ होत सिलेंडर 896 रुपयांना मिळणार आहे. दरम्यान, सलग पाचव्या महिन्यात झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना याचा फटका असणार असल्याचे दिसत आहे.भाववाढीनंतर कोलकातामध्ये नागरिकांना १४९ रुपये जास्त मोजून ८९६ रुपयांना गॅस सिलिंडर विकत घेता येईल तर चेन्नईमध्ये १४७ रुपयांच्या वाढीसहीत गॅस सिलिंडरचे दर ८८१ रुपयांवर पोहचले आहेत.