सत्कार सोहळ्यातील मानापमान नाट्य ; सहकार गटाच्या संचालकांचा बहिष्कार
जळगाव | प्रतिनिधी
ग.स.सोसायटीतर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात 25 वर्ष पूर्ण करणार्या ज्येष्ठ सभासदांना 5 हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा गौरव करण्यात येत होता मात्र, काही ज्येष्ठ सभासदांचा गौरव झाल्यानंतर इतर ज्येष्ठ सभासदांना डावलून विद्यार्थ्यांचा सत्कार सुरु करण्यात आला. त्यामुळे इतर ज्येष्ठ सभासदांनी स्टेजवर चढत आमचा अपमान करण्यासाठी आम्हाला बोलाविले का? असा जाब संचालकांना विचारला. यावेळी चांगलाच गोधळ निर्माण झाला होता. तसेच तीव्र शब्दात संताप व्यक्त करत ज्येष्ठ सभासदांनी सत्कार सोहळ्यातून काढता पाय घेतला.
गं. स. सोसायटीतर्फे रविवारी शहरातील संभाजी राजे नाट्यगृहात ज्येष्ठ सभासद, आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सत्कार सभारंभाला दोन तास उशीर झाल्याने व ज्येष्ठ सभासदांना सत्कारात डावलल्याने सत्कार सभारंभ सुरु असताच काही सभासदांनी वाद घालत रोष व्यक्त केला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्यासह आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, आमदार स्मिता वाघ, गं.स. चे अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, व्ही.के. साळुंखे, माजी अध्यक्ष विलास नेरकर, माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले, विश्वास सूर्यवंशी, सहकार गटाचे गटनेते उदय पाटील, प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्या प्रतिभा बोरोले, रागिणी चव्हाण, सुभाष जाधव, उपस्थित होते. दरम्यान ग.स.च्या सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ सभासदांनी संताप व्यक्त केला. यावेळी गोंधळ होत असल्याने याठीकाणी वृंताकनासाठी उपस्थित प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी छायाचित्र काढणे व व्हिडीओ रेकॉर्ड करणे सुरु केले. त्यामुळे ग.स.च्या सत्ताधारी लोक सहकार गटाच्या संचालक पुत्राने एका प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीचा कॅमेरा हिसकावून घेतला. संबंधित पत्रकाराने जाब विचारला असता पत्रकारास अरेरावी केली. त्यानंतर इतर पत्रकारांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी या घटनेचा व्यासपीठावर जाऊन तीव्र निषेध केला. यावेळी त्या संचालक पुत्राच्यावतीने इतर संचालकांनी माफी मागीतल्यावर वाद संपुष्ठात आला.