जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सरकारकडून आंतरजातीय विवाहाला चालना देण्यासाठी आणि समाजात पसरलेली ही संकुचित विचारसरणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला जातेय. त्यामुळे लग्नाचं वय असणाऱ्या तरुण तरुणींना आंतरजातीय विवाह करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत केली जातेय. असे असतांना देखील जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुका येथील बाभळेनाग या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जाती धर्माच्या भिंती तोडून या गावातील युवक युवतीने समाजाचा विरोध पत्कारून आंतरजातीय विवाह केला.
युट्युब लिंक👇
कायदेशीर विवाह झालेला युवक स्वतः त्या गावातील ग्रामपंचायत सदस्य आहे. मात्र या दोघांना गावात राहण्यास मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. युवकाच्या आई-वडिलांना गावातील सरपंचासह लोकप्रतिनिधींनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच विविध पद्धतीचा अवलंब करून या युवकाच्या परिवाराला धमकावण्यात येत आहे.
एकीकडे संविधानाने आंतरजातीय विवाहाला सुरक्षा कवच प्रदान केलेले असताना हे सुरक्षा कवच भेदण्याचे काम गावातील लोकप्रतिनिधी व या प्रकरणातील संबंधित लोक करीत आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींनी या युवक युवतीला वेळोवेळी गावातून हाकलून देण्याचा प्रयत्न करीत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण केला आहे
भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारान्वये आंतरजातीय विवाह सोहळा पार पडत असतात, मात्र जळगाव जिल्ह्यात आजही ग्रामीण भागात या सर्व जुन्या रूढी प्रथा नुसार अद्यापही विरोध होत आहे. ही गोष्ट समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. याप्रकरणी या युवक युवतीने पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र अद्यापही त्यांना संरक्षण देण्यात आलेले नाहीत.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी लोक लाईव्हने संवाद साधला असता, त्यांनी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.