खामगाव- गोपाळनगर भागातील नियमबाह्य नाली बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी 22 डिसेंबर रोजी न.प. मुख्याधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहे.
यासंदर्भात वृत्त असे की, स्थानिक गोपाळनगर भागातील प्रभाग 11 मध्ये गोविंद डाहे यांच्या घरापासून ते सार्वजनिक शौचालय पर्यंत नाली बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविण्याचा कार्यादेश न.प.कडून देण्यात आल्यानंतर संबंधित ठेकेदाराने सप्टेंबर 2019 मध्ये काम सुरू केले होते. मात्र ठेकेदाराने पेव्हर ब्लॉक तर बसविलेच नाही तसेच नाली बांधकाम ही इस्टीमेटनुसार केले नाही. जुन्या नालीवरच मुलामा चढवून नवीन नाली बांधकाम केल्याचे दाखविण्यात आले. तर नालीचे रूंदीकरणामध्ये तफावत असून सरळ रेषेत नाही व निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहेे. याबाबत स्थानिक नागरिक गणेश रामेश्वर भेरडे यांनी डिसेंबर 2019 मध्ये न.प कडे तक्रार केला होती. यानंतर न.प.ने गुणवत्ता तपासणीचा देखावा करून संबंधित ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याची शंका आल्याने गणेश भेरडे यांनी याबाबत सप्टेंबर 2020 मध्ये जिल्हाधिकारी व नगर विकास मंत्रालयाकडे तक्रार केली व याबाबत चौकशी करून संबधित ठेकेदाराचे देयक न काढण्याचे आदेश मुख्याधिकारी यांना देण्यात यावे अशी मागणी केली आहे, यावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने 22 डिसेंबर रोजीच्या पत्रानुसार न.प. मुख्याधिकारी यांना सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे.

