जळगाव :- चोपडा तालुक्यातील कुंड्या पाणी येथे एका महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर तिची प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या अगोदर मयत महिलेस तीन मुले असून चौथे अपत्य हे मुलगी झाल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असताना मात्र मातेचे निधन झाल्यामुळे शोक कळा पसरली आहे.
नबाबाई समीर पावरा (वय २८, रा. कुंड्यापाणी ता. चोपडा) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या कुंड्यापाणी येथे पती समीर, ३ मुले यांच्यासह राहतात. समीर पावरा हे गावालगतच शेतीकाम आणि ऊसतोड करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, नबाबाई ह्या चौथ्यांदा गरोदर होत्या. त्यांचे ९ महिने भरलेले होते. रविवारी दि. १९ मे रोजी सकाळी अचानक घरातच नबाबाई हिची प्रसूती झाली.
वर पडत नाही म्हणून तत्काळ धानोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र नबाबाई हिची प्रकृती खालावल्याने तिला जळगावच्या शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
नबाबाई हिला १०८ रुग्णवाहिकेतून जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात येत असताना रस्त्यातच नबाबाई यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात आणल्यावर नबाबाई हिच्या मुलीला नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तर नबाबाई हिला तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. दरम्यान, मुलगी झाली मात्र मातेने जग सोडले म्हणून चोपडा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.