विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील के. आर. आर. व्यंकटपुरम गावात LG पॉलिमर औद्योगिक इमारतीत गॅस गळती झाली आहे. या गॅस गळतीमुळे उपचारादरम्यान एका लहान मुलासह 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे तर धक्कादायक म्हणजे 2000 जणांवर उपचार सुरु आहेत. यात २० लोक गंभीर आहे. अचानक गॅस गळती झाल्यानं तातडीनं 3 किलोमीटपर्यंत असलेल्या गावातील स्थानिकांना घर खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याबाबत कळू शकलेले नाही.

अचनक गॅस गळती झाल्यानं श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांमध्ये जळजळ होऊ लागली. तिथल्या काही लोकांना गोपालपुरमच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक लोकांच्या उपचारासाठी रुग्णालयात १५०० ते २००० बेडची व्यवस्था करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
गॅस गळतीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाले आहेत. पोलिसांनी हा परिसर पूर्णपणे सील केला आहे. दरम्यान गॅस वेगानं पसरत असल्यानं 3 किलोमीटरपर्यंत परिसरात राहणाऱ्या लोकांना त्रास झाला आहे. ही गॅस गळती कशामुळे झाली याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. कोरोनाचं संकट असताना आता गॅस गळतीच्या या दुर्घटनेमुळे विशाखापट्टणम हादरलं आहे.

