गुवाहाटी :– आसाममधील महत्वाचे शहर असणाऱ्या गुवाहाटीत एका शॉपिंग मॉलसमोर बुधवारी झालेल्या ग्रेनेड स्फोटात 12 जण जखमी झाले. त्या घटनेनंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. जान्हवी साइकिया आणि प्रनॉमॉय राजगुरु अशी या आरोपींची नावे असून ते दोघेही युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी सांगितले की, गुवाहाटीतील बाघोरबारी येथे एका घरावर पोलिसांनी छापा टाकला. हे घर राजगुरु आणि जान्हवी या दोघांनी भाड्याने घेतले होते. घरातून स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले. यात २० किलो गनपावडर, बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे अन्य साहित्य, ९ एमएम पिस्तूल आणि ‘उल्फा’शी संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे.
राजगुरु हा १९८६ पासून उल्फासाठी काम करतो, तर जान्हवी त्याला मदत करते, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. दोघेही ‘उल्फा’साठी काम करत होते. त्यांना संघटनेच्या वरिष्ठांकडून आदेश यायचे आणि दोघेही त्याची अंमलबजावणी करायचे. बुधवारी झालेल्या बॉम्बस्फोटामागे दोघांचा हात असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे, असे दीपक कुमार यांनी सांगितले. जान्हवी आणि राजगुरु हे १ मेपासून भाड्याच्या खोलीत राहत होते. काम झाल्यानंतर हे घर स्फोटाद्वारे उडवण्याचा त्यांचा डाव होता. बुधवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या वेळी जान्हवी घटनास्थळी होती का, याचा देखील तपास सुरु आहे, असेही पोलिसांनी म्हटले आहे. जान्हवीने काही टीव्ही मालिकांमध्ये सहकलाकार म्हणून काम केले आहे.