Monday, September 26, 2022

गुलाबराव देवकरांच्या निवडीने सहकाराला बळकटी !

- Advertisement -

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या चेअरमन – व्हॉ. चेअरमनपदी महाविकास आघाडीच्या ठरलेल्या सूत्राप्रमाणे निवड झाली. चेअरमनपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांची चढाओढ सुरू होती. राष्ट्रवादीतर्फे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना पूर्ण अधिकार दिले असल्याने बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा खडसे कन्या ॲड. रोहिणींची निवड होणार तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांची वर्णी लागणार असे बोलले जात होते.

- Advertisement -

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संजय पवार भेटून आल्यावर अजितदादांनी त्यांना चेअरमनपदाचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु बँकेच्या चेअरमनपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची निवड करून एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात बळकट करण्याचे तसेच सहकाराला बळकटी आणण्याचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या गोटात जे काही अनुमान लावले जात होते त्याला खडसेंनी पूर्ण तडा देऊन योग्य व्यक्तींची निवड केल्याचे दाखवून दिले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

गुलाबराव देवकर यांचा राजकीय प्रवास जळगाव नगरपालिकेत नगरसेवक पदापासून झाला. त्यानंतर जळगावचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. जळगाव जिल्ह्यात मजुरांना काम मिळावे म्हणून जळगाव जिल्ह्यात मजूर सोसायट्या स्थापन केल्या. त्याचबरोबर मजूर सह. फेडरेशन स्थापन करून संस्थापकाची भूमिका पार पाडत आहेत.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद यशस्वीरित्या पार पाडले आहे. 2009 साली जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवून विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा पराभव करून ते निवडून आले. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचेवर विश्वास टाकून महाराष्ट्र मंत्रीमंडळात त्यांना राज्यमंत्री करून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीसुध्दा केले.

आपल्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत गुलाबराव देवकरांनी जिल्ह्यात लक्ष्यवेधी विकास कामे खेचून आणली. जळगाव शहरातील वैभवात भर टाकणारे संभाजी राजे नाट्यगृह ही त्यांचीच देण आहे. अख्खे 33 कोटींचे अनुदान मंजूर करून आणणारे महाराष्ट्रातील ते एकमेव मंत्री होत. जळगावात असलेले लांडोरखोरी उद्यान त्यांच्याच पाठपुराव्यामुळे झाले आहे. धरणगाव येथील रेल्वेउड्डाण पूल त्यांनी मंजूर करवून घेतला. धरणगाव तालुका क्रीडा संकूल त्यांच्या काळात मंजूर झाले. कामाला सुरूवातही झाली. तथापि त्यानंतर ते संकुल तसेच पडून आहे. बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकासाठी जागाही त्यांच्या कारकिर्दीत मिळविली. परंतु ते स्मारक अद्याप पुढे सरकले नाही. तीच अवस्था असोदा येथील कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या स्मारकाची झाली असे म्हणता येईल. गुलाबराव देवकरांचे वैशिष्ट्य म्हणजे कमी बोलणे आणि जास्त काम करणे हे होय. दुर्दैवाने त्यांना कोर्टाच्या अडचणीमुळे मंत्रीपद सोडावे लागले. अन्यथा जिल्ह्यासाठी आणखी विकास कामे खेचून आणली असती.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना सध्या जिल्हा बँकेला असलेला ब वर्गाचा दर्जा जाऊन लवकर बॅकेला अ वर्गाचा दर्जा मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी कार्य करेल असे आश्वासनही त्यांनी दिले. गुलाबराव देवकरांना सहकाराचा मोठा अनुभव आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे ते सलग 30 वर्षे संचालक आहेत. त्याचबरोबर दोन वेळा त्यांनी बँकेच्या व्हॉ. चेअरमनपदाचीही धुरा सांभाळली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सह. बॅकेचा प्रदिर्घ अनुभव आता त्यांच्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीसाठी उपयुक्त ठरणार आहे. जिल्हा बँकेबरोबरच मजूर सहकारी फेडरेशनचाही त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या समृध्दीसाठी गुलाबराव देवकरांचे चेअरमनपद उपयोगी ठरेल. गुलाबराव देवकरांकडे असलेल्या अनुभवामुळे तसेच त्यांच्याकडे असलेल्या कार्यक्षमतेमुळे एकनाथराव खडसे यांनी केलेली त्यांची निवड सार्थ आणि योग्य आहे अर्थात एकनाथराव खडसे यांनीसुध्दा राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या सल्ल्यानेच ही निवड केली असणार यात शंका नाही. कारण यापुढे जिल्ह्यातील विविध निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकनाथराव खडसेंना पक्षात बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. म्हणूनच त्यांनी स्वत:च्या मुलीऐवजी गुलाबराव देवकरांची निवड केली आहे.

जिल्ह्यात आगामी काळात महाविकास आघाडीचा सामना भाजपशी असणार आहे. भाजपचे जिल्ह्यातील विद्यमान नेते माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे एकनाथराव खडसे यांचे चेले समजले जातात. गिरीश महाजनांना त्यांनी राजकारणात चड्डीचे नाडे कसे बांधावेत हे शिकवले आहे. त्यामुळे गुरू – चेल्यांमध्ये आगामी काळात चांगलाच सामना रंगणार आहे. त्यातील बँकेमधून भाजपला पूर्णपणे संपुष्टात आणण्याची पहिली लढाई खडसेंनी जिंकलेली आहे. सत्तेचा दुरूपयोग करून बँकेत सत्ता हशील करण्यात काही मर्दपणा नाही. आगामी जि.प., पं.स., नगरपालिका निवडणुकीत भाजप त्यांना धूळ चारेल अशी भाषा आ. गिरीश महाजन करीत असतील तर घोडामैदान जवळच आहे. काय होते ते कळेलच. परंतु आज तरी जिल्ह्यत सहकार क्षेत्रातील एक महत्वाची संस्था शेतकऱ्यांच्या बँकेवर महाविकास आघाडीने कब्जा केला आहे. त्यातच गुलाबराव देवकरांसारखा अनुभवी मुरब्बी नेत्याची चेअरमनपदी निवड करून राष्ट्रवादीने भाजपला शह दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे गुलाबराव आणि शिवसेनेचे गुलाबराव हे पूर्वाश्रमीचे कट्टर राजकीय शत्रू एकत्र आल्याने भाजपविरोधाची शक्ती वाढलेलीच आहे. गुलाबराव देवकरांच्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीला दै. लोकशाहीच्या हार्दिक शुभेच्छा!

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या