पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा – धरणगाव रस्त्यालगत असलेल्या पिंपरखेड मारुती मंदिराजवळ रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास पारोळा पोलिस वाहन तपासणी करीत असताना धरणगाव येथील सतीश रमेश पाटील यांच्या मालकीच्या असलेल्या टेम्पोच्या तपासणीत तीन लाख ६६ हजार रुपये किमतीचा गुटखा व दीड लाख रुपये किमतीचा टेम्पो असा पाच लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस गुटख्यासह ताब्यात घेतल्याची कारवाई रात्री ११ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
पारोळा पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, सपोनि निलेश गायकवाड, हेड कॉन्स्टेबल बापू पारधी, सत्यवान पवार, महेश पाटील यांनी पारोळा- धरणगाव रस्त्यावरील पिंपरखेड मारुती मंदिरा जवळ सरकारी पोलीस गाडी साईडला लावून गाड्यांची तपासणी करीत असताना धरणगावकडून येणारा महिंद्रा टेम्पो क्रमांक एम एच १९ बी. एम. ४९५७ वरील चालक सतीश रमेश पाटील ( वय ३८, रा. राम मंदिर समोर धरणगाव) याची तपासणी केली असता गाडीत विमल, गुटखा, तंबाखु, सुगंधी गुटखा असे एकूण ८ गोण्यामध्ये भरलेला गुटखा एकूण किंमत तीन लाख ६६ हजार ८० रुपये, तर १ लाख ५० हजाराचा रुपये किमतीचा मालवाहतुक टेम्पो असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पारोळ्यात ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती मिळाली आहे. सदर गुटखा हा माल गाडी भाडे एक हजार रुपये देऊन भटू मराठे धरणगाव यांनी पारोळा येथील कैलास चौधरी यांच्याकडे पोहोच करण्यास सांगितले असल्याची माहिती टेम्पो चालक सतीश पाटील यांनी पारोळा पोलिसांना दिली. याबाबत पोलीस नाईक प्रवीण रमेश पारधी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून सतीश रमेश पाटील या विरुध्द अन्नसुरक्षा कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहेत.