अहमदाबाद : गुजरातमध्ये सध्या पाणी टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. राज्यातील अनेक गावे पाणीटंचाईचा सामना करत असताना उन्हाळ्यात हे संकट अजून जास्त होण्याची चिन्हे आहेत. नर्मदा धरणातील पाणी साठा कमी होत चालला असून, अन्य जलाशयेही कोरडी पडू लागली आहेत. विशेष म्हणजे मागील पावसाळ्यात चांगला पाऊस पडूनही ही परिस्थिती ओढावली आहे. सरदार सरोवर पूर्ण झाल्यावर राज्याची पाणीटंचाई संपेल, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री असताना केली होती. पण टंचाई कायमच आहे.
राज्यातील १८ हजार खेडेगावांपैकी ४,२३८ गावात पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. ग्रामीण, आदिवासी भागातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक हातपंप नादुरुस्त आहेत. उत्तर ते मध्य गुजरातच्या आदिवासी गावात टंचाईच्या झळा अधिक तीव्र आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीपासूनच काही गावांत पाणीटंचाई भासू लागली. मार्चमध्ये ती आणखी वाढली. त्यामुळे एप्रिल ते जून म्हणजे पावसाळा सुरू होईपर्यंत हालच होतील, अशी भीती व्यक्त होत आहे. सरदार सरोवरात सध्या पाण्याची पातळी १०५ मीटर आहे. सरासरी पातळीपेक्षा ती ५० टक्क्यांनी कमी आहे. मान्सूनच्या काळात २१४ किमी पर्यंतच्या जलाशयात पाणी जाते. आता ही मर्यादा ९० किमीपर्यंतच आली आहे. उन्हाळ्यात ती आणखी कमी होऊ शकते. आता या प्रकल्पातील मृत पाणीसाठा वापरावा लागणार आहे.