जळगाव जिल्ह्यातील भाजपची शनिवारी बैठक झाली. बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे हेही या बैठकीला उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर झालेल्या भाजपच्या जिल्हास्तरीय बैठक महत्वाची होती. भाजपचे दोन्ही खासदार, सर्व आमदार, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, जि.प. सदस्य, पं.स. सभापती, पं.स. सदस्य आदिंसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित भाजपचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील हे ही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला संबोधन करतांना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दोन महत्वपूर्ण घोषणा केल्या आणि एका दगडात दोन पक्षी मारले.
भाजप सोडून जाणार्याांनी खुशाल जावे त्यांचा पक्षांवर काहीही परिणाम होणार नाही. भाजपचे जळगावचे माजी खासदार ए.टी. पाटील यांना भाजपने तिकिट नाकारल्यामुळे ते भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा चालू आहे. तो संदर्भ घेऊन ए.टी. पाटलांना गिरीश महाजनांनी टोला मारला असला तरी ए.टी. पाटील त्यांचे दृष्टीने किरकोळ व्यक्ती असून त्यांचा खरा रोष माजी मंत्री आ. एकनाथराव खडसेंवर होता हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत होते. म्हरजे पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचे नेतृत्व करतांना आ. एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत महाजनांनी वक्तव्य केले. त्यामुळे भाजपतील खडसे समर्थक गोटात खळबळ उडाली असणे साहजिक आहे. पक्ष सोडून जाणार्याांनी खुशाल जावे असा गिरीश महाजनांनी जणू इशाराच दिलेला आहे.
याच बैठकीत संबोधन करतांना महाजनांनी विरोधी पक्षांवर जोरदार प्रहार केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपत प्रवेश घेण्यासाठी माझ्या मुंबईतील बंगल्याबाहेर रांग लावून बसलेले असतात असे खळबळजनक वक्तव्य करून आता महाराष्ट्रात विरोधकांचे फक्त 50 आमदार असतील. विरोधी पक्ष शिल्लकच राहणार नाही असेही महाजन यांनी सांगितले. त्यामुळे गिरीश महाजन यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत म्हणजे स्वपक्षीय पक्ष सोडून जाणार असतील तर त्यांनी खुशाल जावे असा गर्भिय इशारा दिला. तसेच विरोधी पक्ष शिल्लकच राहणार नाही असेही सांगून विरोधकांनाही गारद केले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जळगाव जिल्हास्तरीय भाजपची बैठक महत्वपूर्ण म्हणता येईल. 2014 च्या झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात भाजपचे उमेदवार निवडून येण्यासाठी नाथाभाऊंनी विशेष मेहनत घेतली होती. त्यांच्या प्रयत्नाला यशही मिळाले होते. त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठीचे खडसे हे दावेदार होते. तशी त्यांनी इच्छाही व्यक्त केली होती. परंतु ऐनवेळी नाथाभाऊंचे नाव मागे पडले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस हे नाथाभाऊंना युनीअर असले तरी संघाचे त्यांना पाठबळ मिळाले.
फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर त्यांनी त्या संधीचे सोने केले. मंत्रीमंडळात नाथाभाऊंना दोन क्रमांकाचे महसूल खात्यांसह सात खाते दिले होते. परंतु पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील जागा प्रकरणात नाथाभाऊंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांना मंत्रीमंडळात स्थानच मिळाले नाही. दरम्यान जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मंत्री बनले. एवढेच नव्हे तर ते भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाऊ लागले. जळगाव, धुळे नगरपालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्याने गिरीश महाजनांचे आणखी पक्षात तसेच मुख्यमंत्री फडणवीसांजवळ वर्चस्व वाढले. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात का होईना गिरीश महाजन यांचेकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले गेले. हा एकनाथराव खडसे यांना एकप्रकारे शहच दिला गेला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांचे पक्षात चांगलेच वर्चस्व राहणार आहे.