जळगाव – लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून भाजपचे आठही खासदार निवडून आणणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यकर्तुत्वामुळे खानदेशला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. लोकसभेतील यशाबाबत त्यांचे अभिनंदन करणारे फलक त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावली असून त्यात भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे.
ना. गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले मित्र आहे. मोर्चे, आंदोलनातून सरकारला बाहेर काढण्यासाठी महाजन यांनी यशस्वी मध्यस्थी केली आहे. याशिवाय जळगाव, नाशिक, धुळे, महापालिकेवर भाजप झेंडा फडकाविला तर आता लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदार संघाची जबाबदारी यशस्वीपणे पेलून त्यांनी आठही उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे पक्षातील त्यांचे वजन वाढले आहे. फडणवीस यांना पक्षाने केंद्रात प्रमोशन दिल्यास महाजन यांचा मुख्यमंत्रीपदासाठी नंबर लागू शकतो, अशी भाजपमधील कार्यकर्त्यांनाही अपेक्षा आहे.त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाच्या फलकावर कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे.