गिरीश बापट, उन्मेश पाटलांसह विखे यांचा आमदारकीचा राजीनामा

0

मुंबई :- पुण्याचे आमदार तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट व आमदार उन्मेश पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणूकीपासून स्वपक्षावर नाराज असलेले कॉंग्रेसचे बंडखोर नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या आमदार पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. विखे-पाटलांच्या राजीनाम्यामुळे त्यांचा पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपा प्रवेश निश्‍चित मानला जात आहे.

भाजपाचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट व जळगावचे आमदार उन्मेश पाटील यांना पक्षाने लोकसभा निवडणूकीच्या मैदानात उतरवले होते. उन्मेश पाटील यांनी 7 लाख 13 हजार 874 तर बापट यांनी 6 लाख 32 हजार 835 मते मिळवत विजयी झाले आहेत. आमदारांचा लोकसभा निवडणूकीत विजय झाल्यानंतर नियमानुसार त्यांना 14 दिवसांच्या आत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार या दोघांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला. तर बापट यांनी मंत्रिमंडळाच्या निमित्ताने मंत्रालयात उपस्थित राहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

दुसरीकडे लोकसभा निवडणूकीत आपल्या मुलाला कॉंग्रेसने उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यापूर्वीच आपल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूकीत बंडखोरी केल्याबद्दल कॉंग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्यापाश्वभूमिवर विखे-पाटील हे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती.

मात्र, विरोधी पक्षनेतेपदापाठोपाठ त्यांनी आज आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिल्याने त्यांचा भाजपा प्रवेश लवकरच होणार असल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनीही राजीनामा दिल्याची चर्चा होती. परंतु, त्यांना भाजपामध्ये होत असलेला विरोध पाहता त्यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.