गाळेधारक प्रकरणी 22 रोजी कामकाज
जळगाव- मनपा प्रशासनाने 81 ब प्रमाणे बजाविलेल्या नोटीसीविरुद्ध पाच गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. याबाबत बुधवारी कामकाज होवून या प्रकरणी 22 ऑक्टोबर रोजी पुढील कामकाज होणार असून अद्याप कारवाई का करण्यात आली नाही अशी न्यायालयाने विचारणा करुन प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
महानगरपालिका प्रशासनाने सेंट्रल फुले व फुले मार्केट येथील गाळेधारकांना 81 ब प्रमाणे नोटीस बजावलेल्या होत्या. या बिलांच्या थकबाकीच्या नोटीसी या अवाजवी असल्याचे गाळेधारकांचे म्हणणे होते. या प्रकरणी नोटीसीला स्थगिती मिळावी यासाठी शितलदास जवहरानी, आनंद नाथाणी, कांतीलाल डेडिया, सुभाष सराफ, वासुदेव गेही या पाच गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी बुधवारी न्या. सावंत यांच्या न्यायालयात कामकाज होवून या प्रकरणी न्यायालयाने 22 ऑक्टोबर रोजी कामकाज ठेवले आहे. कामकाजादरम्यान न्या. सावंत यांनी आजपर्यंत कारवाई का करण्यात आली नसल्याची विचारणा प्रशासनाला केली असल्याची माहिती आयुक्त डॉ. टेकाळे यांनी दिली. तर या प्रकरणी प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्या. सावंत यांनी दिले.