नवी दिल्ली : सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवारी केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. सुरेश वाडकरांनी मराठीसह भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी ,उर्दू भाषेत गाणी गायली आहेत.
ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था, तू सप्तसूर माझे, सुरमयी अखियों मे, ऐ जिंदगी गले लगा ले, मेघा रे मेघा रे, सपने में मिलती है, चप्पा चप्पा चरखा चले यासारखी अनेक गाजलेली गाणी वाडकरांच्या आवाजात स्वरबद्ध झाली आहेत. ‘पद्मश्री’च्या रुपाने सुरेश वाडकरांच्या स्वरमयी कारकीर्दीला कोंदण लाभलं आहे. दरम्यान, हा पुरस्कार जाहीर झाल्याबाबद्दल त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. देशातील इतका मोठा पुरस्कार मिळाल्याचा मला मोठा आनंद झाला आहे. मला लतादीदी, गुरुजी, आई-वडील, तसेच संगीतकार रवींद्र जैन यांची आठवण येत असल्याचे वाडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
सुरेश वाडकर याचा जन्म ७ ऑगस्ट, इ.स. १९५५ रोजी कोल्हापूर येथील चिखली गावी झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. 2007 साली त्यांना महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव केला आहे. तसेच मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.