जळगाव दि. 21 –
अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भरविण्यात येत असलेल्या गांधी गोईंग ग्लोबल या जागतिकस्तरावरील प्रदर्शनात गांधी रिसर्च फाऊंडेशनचा देखील सहभाग असणार आहे. हे प्रदर्शन 24 मे ते 26 मे दरम्यान न्यू जर्सी येथे भरविण्यात येणार आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनकार्याचा प्रचार आणि प्रसार करणार्या जगभरातील संस्था यात सहभागी होणार आहेत. तीन दिवस चालणार्या या प्रदर्शनात जगभरातील गांधीवादी, अभ्यासक मोठ्या प्रमाणावर भेट देणार आहेत. याच प्रदर्शनात गांधीजी आणि कस्तुरबा यांच्या 150 व्या जयंतीच्या वर्षानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने टपाल विभागाच्या विशेष पाकिटाचे अनावरण केले जाणार आहे. या पाकिटावर न्यू जर्सीच्या टपाल विभागाचा शिक्का असणार आहे.
बा-बापू 150 जयंतीवर्ष जागतिक पातळीवर साजरे केले जावे या उद्देशाने गांधी गोईंग ग्लोबल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गांधी रिसर्च फाऊंडेशनचे भव्य दालन
गांधी गोईंग ग्लोबल या जागतिक दर्जाच्या प्रदर्शनात गांधी रिसर्च फाऊंडेशनचे जवळपास 25 हजार स्के. फुट इतक्या मोठ्या आकाराचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. हे प्रदर्शन महात्मा गांधीजींच्या जीवनातील अनेक घटना आणि घडामोडींवर प्रकाश टाकणारे असणार आहे. 14 विभागात तयार केलेले हे प्रदर्शन महात्मा गांधीजींच्या विविध तत्त्वांचे प्रातिनिधीत्व करणारे आहे. जगभरात नावलौकिक मिळवलेल्या नेत्यांना गांधीजींबद्दल काय वाटते याबद्दलची माहिती वर्ल्ड ग्लोबल लीडर या विभागात पहायला मिळेल.
महात्मा गांधीजींचे चारित्र्य कसे निर्माण झाले. मोहनदासच्या जीवनात पारदर्शकता कशी आली याबद्दलची माहिती आगळ्या -वेगळ्या पद्धतीने मांडण्यात येणार आहे. या विभागात लहान लहान तंबू असतील. गांधीजींची माहिती चित्र आणि कॉमिक्सच्या रुपात निमेशनच्या स्वरुपात मांडली जाणार आहे. अनेक प्रकारचे गेम्स या ठिकाणी असणार आहेत. हे गेम्स खेळता खेळता गांधीतत्त्वाची ओळख होणार असून त्यामुळे तरुण आणि लहान मुलांच्या विचारांना चालना मिळणार आहे.
गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन जगातील 50 देशांनी स्वातंत्र्य मिळवले आहे. गांधी विचारांचा स्वीकार करून त्यांचा प्रचार आणि प्रसार करणार्या अनेकांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. शांततेचा नोबल पुरस्कार विजेत्या जगभरातील नेत्यांच्या नजरेतून गांधीजी त्यांना कसे वाटले याबद्दल 20 ते 26 जणांचे मनोगत या मांडण्यात आलेले आहे.
गांधी रिसर्चफच्या कार्याची माहिती
गांधी रिसर्च फाऊंडेशनने महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन ग्राम विकासाचे कार्य हाती घेतले आहे. या कार्याच्या संदर्भातील माहिती या विभागात मांडली आहे. याशिवाय गांधी विचार परीक्षा, गांधी तिर्थ येथे सुरू असलेले ऑडीओ गाईडेड म्युझीयमची माहिती देखील यात दिली जाईल. याशिवाय येणार्या व्यक्तीच्या समस्यांना उत्तरे देण्यासाठी गांधी विचारांचे अभ्यासक याठिकाणी उपस्थित मार्गदर्शन करतील. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधीजी आणि अमेरिका यांच्यातील संबंधावर आधारित विशेष टपाल पाकिटाचे विमोचन केले जाणार आहे.
प्रदर्शनी वर्षभर अमेरिकेत राहणार
गांधी गोईंग ग्लोबल या प्रदर्शनाचा समारोप झाल्यानंतर येथे लावण्यात आलेले गांधी रिसर्च फाऊंडेशनची प्रदर्शनी अमेरिकेतील गांधीयन सोसायटीला भेट स्वरुपात दिली जाणार आहे. त्यानंतर ही प्रदर्शनी अमेरिकेतील विविध प्रांतात पुढील वर्षभर लावली जाईल. तसेच गांधी रिचर्स फाऊंडेशन आणि मेक्सिको सॅटीस युनिव्हर्सीटी यांच्यात करार झाला असून त्यानुसार गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने डॉ. जॉन चेल्लादुराई आणि अश्विन झाला हे कार्यशाळा (वर्कशॉप) घेणार आहेत. या अतिभव्य आणि जागतिकस्तरावरील प्रदर्शनाच्या उभारणीसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
ठळक वैशिष्ट्ये
गांधी गोईंग ग्लोबल प्रदर्शन भरणार एक लाख स्के. फुट जागेत.
गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रदर्शन असेल 25 हजार स्के. फुट जागेत.
गांधीजींबद्दल जागतिक नेत्यांचे मनोगत पहायला मिळेल प्रदर्शनात.
गांधीजींचे जीवनकार्य निमेशनच्या स्वरुपात मांडण्यात येणार.
प्रदर्शनस्थळी तुरुंगाची उभारणी, दर्शक घेणार अनुभव.
प्रदर्शनात गांधीवादी सांगतील आधुनिक समस्यांवर उपाय.
गांधीजींवर आधारित विशेष टपाल पाकिटाचे होणार विमोचन.
कोट
जागतिक दर्जाच्या ङ्गगांधी तिर्थफच्या उभारणीत भवरलालजी जैन अर्थात आपले सर्वांचे मोठे भाऊ यांचा पुढाकार होता. तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे देखील मार्गदर्शन लाभले होते. जळगाव सारख्या ठिकाणी उभारलेल्या ङ्गगांधी तिर्थफचा सहभाग थेट जागतिक पातळीवरील प्रदर्शनात व्हावा ही जळगावकरांसाठी गौरवाची बाब आहे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी फाऊंडेशनने ग्राम विकासाचे कार्य हाती घेतले आहे, त्याची देखील माहिती या प्रदर्शनातून जगासमोर मांडली जाणार आहे. जगभरातील गांधीवादी या प्रदर्शनाला भेट देणार असून महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी असंख्य लोक जोडले जाणार आहेत.
– अशोक जैन,
संचालक, गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव.