गलवाडे रोडला घरफोडी ; २ लाखाचा ऐवज लंपास

0

अमळनेर(प्रतिनिधी) :  शहरातील गलवाडे रोड ला लागून असलेल्या ताराचंद नगर येथे २६  तारखेला रात्री १ ते सकाळी ७ च्या दरम्यान अज्ञात चोरांनी घरफोडी करून २ लाख रकमेसह ३६ हजार रुपये किंमतीचे दागिने असा सव्वा दोन लाखाच्या वर मुद्देमाल चोरीस नेला आहे.कमलेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमलेश सोनवणे(गलवाडे रोड,ताराचंद नगर) हे आपल्या आई व भावासह राहतात.आईचा साडी विक्रीचा व्यवसाय असून त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.आई आणि भाऊ कामानिमित्त अहमदाबाद(गुजरात)येथे गेलेले होते.कमलेश सोनवणे हे  मावशीसह घरीच होते,रात्री १० वाजता जेवणानंतर ते घरातच झोपले परंतु रात्री घराचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ते रात्री १ वाजता घराला कुलूप लावून गच्चीवर झोपायला गेले.

सकाळी उठल्यावर घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला तर  घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते.यावेळी घरातील २ लाख रुपये नगद व ३६ हजार रुपये किमतीचे ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले नाहीत.

कमलेश सोनवणे यांनी अज्ञातांविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा नोंद केला आहे.चोरांविरोधात भा द वि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.पुढील तपास ए पी आय राकेशसिंग परदेशी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.