मुक्ताईनगर :- मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालयात सभेच्या ठिकाणी पत्रकाराचा चोरीस गेलेला मोबाईल गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास जेरबंद करण्यात जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखा तसेच मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून अजून गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता चोरट्यांची टोळी असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मुक्ताईनगर येथील भुसावळ रोड वरील गोदावरी मंगल कार्यालयात 12 फेब्रुवारी रोजी ना. जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी रात्री साडेआठ वाजता सभा सुरू झाल्यानंतर पत्रकार संदीप जोगी हे वृत्त संकलन साठी गेले आणि त्या ठिकाणी मोबाईलद्वारा फोटो काढले. त्यानंतर वृत्तसंकलन करीत असताना काही वेळाने त्यांनी खिशात ठेवलेला मोबाईल चाचपून पाहिला असता तो आढळून आला नाही तसेच आजूबाजूला उपस्थित असलेल्याकडे चौकशी केली असता तो सापडून आला नाही. त्यामुळे त्यांनी रेडमी नोट 8 हा मोबाईल हरविल्याची फिर्याद मुक्ताईनगर पोलिसात दिली होती. त्यानुसार मुख्य नगर पोलिसांनी सदर तपास जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपासाची चक्रे फिरविण्यात आली.
जवळजवळ दोन महिने सदर मोबाईल बंद अवस्थेत असल्यामुळे त्याचा ट्रेस लागण्यास विलंब लागला परंतु चोरट्याने सदर मोबाईल मध्ये टाकता बरोबर सदर मोबाईलचा ट्रेस लागला आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी हवालदार संजय हिवरकर राजेश मेढे, रवी नरवाडे , संतोष मायकल , संदीप धनगर ,रावसाहेब पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे ये एस आय विजय पाटील दिनेश बडगुजर नरेंद्र वारुळे संदीप धनगर अशा कर्मचाऱ्यांची पथके तयार केली या पथकाने पत्रकार संदीप जोगी यांचा मोबाईल ज्या ठिकाणी चोरीला गेला त्या घटना स्थळावरील ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज व इतर माहिती काढून तपास केला. यामध्ये मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक निलेश सोळंके, ए.एस.आय. सादिक पटवे, हवालदार संतोष नागरे, हवालदार श्रावण जवरे यांनी सहकार्य केले.
या प्रकरणात जळगाव गेंदालाल मिल येथील शंकर मधुकर निकम यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान या कामगिरीमुळे मुक्ताईनगर पोलीस तसेच जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अजून गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता – पोलीस निरीक्षक शिंदे
अटक करण्यात आलेल्या शंकर निकम या चोरट्या विरुद्ध यापूर्वीही जळगाव शहर पोलिसात गुन्हे दाखल असून चोरट्यांची टोळी असण्याची शक्यता असल्याचे मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी वर्तविली आहे.