चेन्नई । प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं वयाच्या ७४ वर्षी निधन झालं आहे. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी करोनावर मात केली होती. याविषयी त्यांच्या मुलाने एसपी चरण यांनी माहिती दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली म्हणून त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिली होती.
दरम्यान, आज सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याचे वृत्त होते. ही बातमी कळताच प्रख्यात अभिनेते कमल हासन यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन एसपी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटलं जायचं. तेलुगु, तामिळ, हिंदी आणि इतर भाषांतील गाणी एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी गायिली आहेत. त्यांनी जवळपास ४० हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे.केवळ संख्या म्हणून नव्हे, तर एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांत तब्बल 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी 16 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे.