मुंबई : कोरोनाच्या धास्तीने जागतिक मंदीचे सावट पसरले आहे. याचे पडसाद शेअर बाजारात दिसून येत आहेत. एकीकडे शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणुकदारांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे सोने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. सोन्याचे भावही शेअर बाजारात उघडताच पडले आहेत. सोन्याच्या भावात 2600 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 41,556.00 रुपयांवर आला आहे. तर चांदीच्या दरातही घसरण नोंदवली गेली आहे.

करोना विषाणूचा प्रभावामुळे सोन्याच्या किंमती वाढतील अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात १२८ रुपयांनी घट नोंदवण्यात आली होती. त्यामुळे भाव ४४ हजार ४९० रुपयांवर आला होता. तर चांदीचे दरही ३०२ रुपयांनी स्वस्त झाले होते. चांदीला प्रति ४६ हजार ८८६ रुपये भाव होता. त्याचबरोबर कमॉडिटी मार्केटमध्ये (वस्तू बाजार) सोन्याच्या दरात ५८ रुपयांची घट झाली होती. त्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४३हजार २९७ रुपये इतका झाला होता.
दरम्यान, आज शुक्रवारी शेअर बाजार उघडताच निर्देशांकात तब्बल ३ हजार ९०.६२ अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकही ९६६.१ अंकांनी घसरला. सोन्याच्या दरावरही याचे परिणाम झाले असून, दरात ऐतिहासिक घट झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 36 पैशांनी वधारला.

