नवी दिल्ली : भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार होत असल्याचे जाहीर केले होते. या लसीची मानवी चाचणीही आता सुरु झाली आहे. दिल्लीतील एआयआयएसएस ( इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) सोबत मिळून फार्मा कंपनी या लशीची मानवी चाचणी घेणार आहे. दोन टप्प्यात ही चाचणी होणार आहे.
पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर या लशीचा प्रयोग केला जाणार आहे. यापैकी १०० जण एआयआयएसएसमधील असतील. १८ ते ५५ वयोगटातील व्यक्तीवर ही चाचणी केली जाणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर १४ दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे. लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर ज्यांच्यावर चाचणी केली त्या स्वयंसेवकांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. कोवॅक्सिनच्या वैद्यकीय चाचणीसाठी आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या १२ ठिकाणांपैकी दिल्लीतील एआयआयएसएस हे एक ठिकाण आहे.हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली. करोनावरील आजारासाठी तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

