नवी दिल्ली – अमेरिकन फार्मा कंपनी फायजर विकसित करत असलेल्या करोना प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. फायजर विकसित करत असलेली लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे. यानंतर सोने आणि चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. कमोडिटी एक्सचेंज सीएमएक्स मध्ये सोन्याचे वायदे (सोन्याचा आजचा भाव) 91 रूपये म्हणजेच 0.18 टक्क्यांनी कमी होऊन 50,410 रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम) झाला आहे. चांदीचे दरही 287 रूपये म्हणजेच 0.34 टक्क्यांनी कमी होऊन 62,832 रूपये प्रति किलोग्रॅम झाले होते.
सोमवारी करोना विषाणूची लस येणार असल्याचे वृत्त आल्याने सोने-चांदीची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले. गुंतवणूकदार सोन्यात गुंतवलेले पैसे काढून शेअर बाजाराकडे वळत आहेत. प्राॅफिट बुकिंमुळे सोने-चांदीच्या दरात घट झाली, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
goodreturns.in या वेबसाईटनुसार बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९७३० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०७३० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९१६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५३६१० रुपये आहे. कोलकात्यात ग्राहकांना २२ कॅरेट सोने खरेदीसाठी ४९०३० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेटचा भाव ५२५३० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ४७८१० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२१४० रुपये आहे.
मागील दोन सत्रात जागतिक बाजारात सोने दरात ५ टक्के स्वस्त झालं होते. करोना प्रतिबंधात्मक लशीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर सोन्यामध्ये मोठी नफावसुली दिसून आल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमॉडिटी विभाग उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले. जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव १.७४ टक्क्यांनी वधारला आहे. प्रती औंस सोने १८८६.६० डॉलर आहे.