खुल्या नभोमंडपी जुळल्या रेशीमगाठी

0

पाचोरा (प्रतिनिधी) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाच्या चालीरीती बदलल्या असून महाराष्ट्रातील खानदेशात विवाह सोहळ्यावर भरमसाठ पैसा खर्च करणाऱ्या मराठा समाजातील  आदर्शव्रती कुटुंबांनी कोरोना आजाराच्या कालखंडात आदर्श पद्धतीने विवाह सोहळा साजरा केल्याने  महाराष्ट्रात एक नवा आदर्श पायंडा घालून दिला आहे.

सामनेर ता. पाचोरा येथील हिरामण सांडु पाटील यांची सुकन्या प्रियंका व वाडी ता. पाचोरा येथील शांताराम पाटील यांचे सुपुत्र प्रवीण या दोघांचा आदर्श विवाह वाडी ता. पाचोरा येथे दि.२७ सोमवार रोजी निसर्गाच्या सानिध्यात खुल्या आणि मोकल्या नभोमंडपात अर्थातच वाडी (शेवाळे) येथील वरपित्याच्या घरावरील गच्चीवर अत्यंत साधेपणाने संपन्न झाला. ग्रामस्थ व नातलगांचे प्रतिनिधी म्हणून वाडी गावाच्या सरपंच शोबाबाई भिकन पाटील व पोलिस पाटील संजय बाबूराव पाटील हे दोघे प्रतिष्ठित यावेळी उपस्थित होते. गल्लीतील, गावातील लोकांनी सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत आप – आपल्या घरातील छत व खिडकीतुन टाळया वाजवुन वधुवरांना शुभ आशिर्वाद दिलेत. याशिवाय नातेवाईक मंडळीने वधुवरांना ऑनलाइन शुभेच्छा दिल्यात.

विशेष म्हणजे हा विवाह सोहळा अगदी साध्या व सोप्या पद्धतीने पार पाडावा हे वधु – वर या दोन्ही कडील मंडळींचा पूर्वनियोजित संकल्प होताच त्याला लॉकडाऊन निमित्तमात्र झाले. कमी खर्चात व कमी श्रमात धार्मिक पावित्र्य जपून विवाह सोपस्कार पूर्ण केल्याने या विवाहाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.

पारंपारिक विवाह पद्धतीत  कालानुरूप फार मोठा बडेजाव आल्याने अनावश्यक पैसा खर्च होऊन वर व वधू पक्षाकडील मंडळींना अतिश्रम, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. विवाह सोहळ्यातील  संपत्ती व पैशाचे प्रदर्शन आणि प्रतिष्ठेच्या हव्यासामुळे होणारा बेसुमार खर्च, धावपळ व इतर त्रास यामुळे कमी झाला. चालीरीती प्रमाणे लग्नपत्रीका वाटप करत असतांना बऱ्याच अपघाती घटना घडतात व त्यात लग्नाचा बेरंग होतो. कित्येकांना तर आयुष्यभरासाठी अपंगत्वरूपी कटु आठवणी बोचत असतात. घोडा, गाडी, मंडप, बैंडचा अवाक्या बाहेरिल खर्च वाचला. वधु – वर, दोन वरमाला व दोन साक्षीदार आणि एक भटजी एवढ्या फक्त पाच लोकांच्या उपस्तिथीत एकाच दिवसात साखरपुडा, हळद व मंत्रोच्चाराने विवाहबंधन पूर्ण झाले. योगेश रावण पाटील व सुवर्णा योगेश पाटील या एकाच जोडप्याने परंपरे नुसार वधु – वर या दोघांना हळद लावली त्यानंतर लगेच विवाह संपन्न झाला. वधू पित्याकडून कन्येच्या लग्नासाठी दिले जाणारे स्त्रीधन यातून पाच हजार शंभर रुपये कोरोनारुपी शत्रुशि लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधित जमा करण्याचा संकल्प वधुवरांनी केला. असा आदर्श सर्व विवाहइछुक वधुवरानी अंगीकारवा असे खानदेश कुणबी मराठा वधुवर गृपचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनहितार्थ आव्हान सुद्धा केले.

विधात्याने निर्मिलेल्या नभमंडपाखाली, ब्राह्मणसाक्षीने, मंत्रोच्चाराच्या ध्वनीलहरित, निसर्गसानिध्यात बांधलेली ही रेशीमगाठ उभयतांच्या आठवणीतली समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे यात शंका नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.